कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (सेक्यूलर) नेते कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून शिकण्यासारखं काही नसून तिथे प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात असं वक्तव्य कुमारस्वामी यांनी केलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कुमारस्वामी यांना आरएसएसच्या शाखेला भेट देऊन तिथे होणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देतानाच त्यांनी ही टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला आरएसएसची सोबत नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवलं जातं हे आपण पाहिलं नाहीये का? विधानसभेत कसं वागावं…अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. आरएसएसच्या शाखेत त्यांना (भाजपाला) हीच गोष्ट शिकवली जात नाही का? हे शिकवण्यासाठी मला तिथे (आरएसएस शाखेत) जाण्याची गरज आहे का?,” अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली आहे. .

पोटनिवडणूक प्रचाराच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मला त्यांच्या शाखेची गरज नाही. शाखेकडून जे काही शिकायचं आहे ते मी गरीबांच्या शाखेकडून शिकलो आहे. मला त्यांच्याकडून (आरएसएस शाखा) शिकण्यासारखं काही नाही”.

कुमारस्वामी २०१२ मधील एका घटनेचा संदर्भ देत बोलत होते जेव्हा भाजपाच्या तीन मंत्र्यांना अधिवेशनादरम्यान मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडण्यात आलं होतं. या घटनेनंतर गदारोळ झाला होता. भाजपा सरकारसमोरही मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान कुमारस्वामी यांनी नुकतंच, आरएसएस एका छुप्या अजेंडाचा भाग असून देशभरातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम तयार केली असल्याचा आरोप केला होता. आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार केंद्रात आणि कर्नाटकात भाजपा सरकार काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी ‘बाहुले’ असा उल्लेख केला होता. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षांनी कुमारस्वामी यांना संघाच्या शाखेत येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former karnataka cm hd kumaraswamy swipe at rss says watching blue films in assembly sgy
First published on: 20-10-2021 at 08:13 IST