former sanitation worker alleges murders in Karnataka Dharmasthala : कर्नाटकमधील एका माजी सफाई कर्मचाऱ्याने पोलिसांना लिहिलेल्या एका पत्राने खळबळ उडवून दिली आहे. या व्यक्तीने त्याला जवळपास १० वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या अनेकांचे मृतदेहांचे दफन करण्यास भाग पाडण्यात आले होते असा दावा केला आहे. पश्चातापाच्या भावनेतून पद्धतशीरपणे झाकून टाकण्यात आलेला हा भीषण गुन्हा उघड करण्यासाठी आपण पुढे आल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.
वकील ओजस्वी गौडा आणि सचिन देसपांडे यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दक्षिम कन्नडा जिल्ह्यातील धर्मस्थळ पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम २११ (अ) (कायद्याने बंधनकारक असणाऱ्या व्यक्तीने सरकारी सेवकाला माहिती देण्यास नकार देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धर्मस्थल येते १९९५ ते २०१४ पर्यंत सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या या व्यक्तीने असाही दावा केला आहे की त्याने अत्यंत क्रूर पद्दतीने काही हत्या होत असताना पाहिल्या आणि त्यानंतर त्याला मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास भाग पाडण्यात आले. दरम्यान ही तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव उघड करण्यात आलेली नाही.
देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या आणि कुटुंबाच्या जीवाला भीती असल्याने हा व्यक्ती २०१४ नंतर शेजारच्या राज्यात पळून गेला. तसेच त्याने पोलीस सुरक्षा दिली जावी आणि ते मृतदेह उकरून काढले जावेत आणि कथितपणे झालेल्या हत्यांचा तपास केला जावा अशी मागणी केली आहे.
तक्रार देणाऱ्या व्यक्तीने आरोप केला की १९९८ साली त्याने मृतदेह दफन करण्यास नकार देत या हत्यांबद्दल पोलिसांना कळवण्याबाबत सुचवल्यानंतर त्याच्या सुपरवायझरने त्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्याने असाही दावा केला की, त्याला काही मृतदेह डिझेल वापरून जाळण्यास आणि इतर धर्मस्थळ गावाच्या भोवती वेगवेगळ्या जागी पुरण्यास भाग पाडण्यात आले.
त्याच्या कुटुंबातील मुलाचा लैंगिक छळ करण्यात आला तेव्हा त्याच्या संपूर्म कुटुंबाला तो भाग सोडून पळून जावे लागले. त्याने आरोप केला की या हत्यांच्या मागे काही शक्तीशाली लोक होते आणि भारतीय साक्ष अधिनियम अंतर्गत संरक्षण मिळाल्यानंतर त्यांची नावे उघड करणार असल्याचेही या व्यक्तीने स्पष्ट केले आहे.
मृतांमध्ये महिलांचा समावेस
या व्यक्तीने लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की त्याने पुरलेल्या अनेक मृतदेहांमध्ये तरुण महिलांचा समावेश होता. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्यासारखे असे दिसून येत होते. “मी शेकडो मृतदेह पुरले आहेत आणि त्यांच्यावर योग्य पद्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. अपराधीपणाची भावना मला सतावत आहे आणि मला वाटते की त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यासाठी मृतांवर अंत्यसंस्कार केले गेले पाहिजेत,” असे त्या व्यक्तीने पत्रात म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास तयार आहेत आणि कथित पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार आहे.