UP Crime News : देशभरात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. मारहाण, संपत्तीचा वाद, घरगुती हिंसाचार, खून, दरोडे अशा अनेक वेगवेगळ्या घटना कोणत्या न कोणत्या कारणांवरून घडतात. गुन्हेगारी कमी करण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता उत्तर प्रदेशात एक भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील किशोरपुरा गावातील माजी प्रधानाने एका विधवा प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घटना काय घडली?

झाशी जिल्ह्यातील किशोरपुरा गावातील एका विहिरीत एका महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलं आहे. या घटनेतील मुख्य आरोपी गावचा माजी प्रमुख असून त्याची ओळख पीडितेचा प्रियकर म्हणून पुढे आली आहे. तो आणि त्याच्या पुतण्याला पोलिसांनी अटक केलं आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

किशोरपुरा गावातील माजी प्रधानावर त्याची प्रेयसी लग्नासाठी सातत्याने दबाव आणत होती. मात्र, त्याचा राग अनावर झाला आणि संतापलेल्या माजी प्रधानाने पुतण्याला बरोबर घेत दोघांनी मिळून तिची हत्या केली. एवढंच नाही तर मृतदेहाचे सात तुकडे करून पोत्यात भरून विहिरीत फेकून दिले. दरम्यान, प्रेयसीच्या सततच्या लग्नाच्या तगाद्यामुळे वैतागून माजी प्रधानाने हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. माजी प्रधान संजय पटेल आणि त्याचा पुतण्या संदीप पटेल असं या घटनेतील आरोपींचं नाव आहे.

घटना उघडकीस कशी आली?

१३ ऑगस्ट रोजी एक शेतकरी आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला त्याच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर विहिरीत पाहिलं असता पाण्यात दोन पोते तरंगताना आढळून आले. त्या पोत्यात एका महिलेचा मृतदेह होता. यानंतर संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि घटना उघडकीस आली.

पोलिसांना तपासात काय आढळलं?

झाशीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आठ तपास पथके रवाना केली होती. पोलिसांना पीडितेचा मृतदेह विहिरीत आढळला तेव्हा मृतदेहाचे डोके आणि पाय गायब होते. त्यामुळे संबंधित महिलेची ओळख पटवणं अवघड होतं. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांना असं आढळून आलं की, पीडितेने माजी प्रधानावर लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे तिची पूर्वनियोजित हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांची चौकशी केली. तसेच २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी यश आलं.