former US Ambassador Nikki Haley stresses on need for US-India friendship : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल घरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून युक्रेनमधील रक्तपातासाठी भारताला जबाबदार ठरवले जात आहे तसेच भारत अप्रत्यक्षपणे रशियाच्या युद्धासाठी निधी पुरवत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी एक गंभीर इशारा दिला असून त्यांनी दोन्ही देशांनी संवाध साधण्याचे आवाहन केले आहे.
“भारताने रशियन तेलाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांना गांभीर्याने घेतले पाहिजे आणि तोडगा काढण्यासाठी व्हाईट हाऊसबरोबर मिळून काम केले पाहिजे. हे जितक्या लवकर होईल तेवढे चांगले. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमधील दशकांची मैत्री आणि सद्भावना ही या सध्याचा गोंधळातून बाहेर पडण्यासाठी एक भक्कम आधार देते. व्यापारातील मतभेद आणि रशियन तेलाची आयात अशा मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी कठोर चर्चा होणे आवश्यक आहे. पण आपण कोणती गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे हे विसरता कामा नये, ती म्हणजे आपली एकसमान उद्दीष्टे. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज आहे,”असे हेली एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यात ट्रम्प प्रशासनाकडून भारतावर सातत्याने टीका केली जात असताना अमेरिकेतील अनेक माजी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्यामध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि माजी परराष्ट्र मंत्री कर्ट कॅम्पबेल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारताबरोबरचे संबंध ज्या पद्धतीने हाताळले जात आहेत त्यावर देखील टीका करण्यात आली आहे. तसेच या नव्याने राबवण्यात आलेल्या धोरणांमुळे एक महत्त्वाचा मित्र देश दूर होऊ शकतो आणि कदाचित नवी दिल्ली ही रशिया आणि चीनच्या जवळ जाऊ शकते, असा इशारा देखील या माजी अधिकाऱ्यांनी दिला आहे. ओबामा यांच्या काळातील अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शुक्रवारी जोरदार टीका केली.
एस. जयशंकर यांनी अमेरिकेला फटकारले
युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याबद्दल अमेरिकेने भारतीय मालावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. त्या निर्णयावर जयशंकर यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भाष्य केले. “भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल ज्यांना समस्या आहे, त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी करणे बंद करावे,” अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेला फटकारले.
जयशंकर म्हणाले की, व्यवसायाभिमुख अमेरिकी प्रशासनासाठी काम करणारे लोक इतरांवर व्यवसाय करत असल्याचा आरोप करणे गमतीदार आहे. त्याचवेळी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू असून काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हितसंबंधांवर सरकार तडजोड करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. यावर आम्ही ठाम आहोत, असे ते म्हणाले.