Four Arrested at Delhi in car with fake MHA plate Delhi Crime News : दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात शनिवारी रात्री उशिरा गृह मंत्रालयाच्या (MHA) नावाची पाटी लावून फिरणार्‍या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांना पोलिसांनी थांबवून त्यांची चौकशी केली असता, त्यापैकी एकाने तो इंटेलिजन्स ब्यूरो (IB)चा अधिकारी असल्याचे सांगितले, तर इतर तिघांनी आपण त्याचे बॉडिगार्ड असल्याचा दावा केला, अशी माहिती पोलि‍सांनी दिली.

आरोपींची ओळख पटली

उत्कर्ष शुक्ला (२१), अखिलेश पांडे (२१), अनिकेत पांडे (२७) आणि राजकुमार (२८) अशी अटक केलेल्यांची नावे असून हे सर्वजण लखनऊचे रहिवासी आहेत. पोलिसांनी उत्कर्ष शुक्ला याच्याकडून बनावट आयबी ओळखपत्र जप्त केले आहे. तसेच यांच्या लक्झरी एसयूव्ही कारमध्ये सायरन आणि हूटर देखील सापडले आहे.

पोलिसांनी सांगितले की, या आरोपींच्या चौकशीदरम्यान उत्कर्ष याने लोकांवर छाप टाकण्यासाठी आणि दिखावा करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केल्याचे कबूल केले. पोलि‍सांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यांना त्याचा फोटो असलेले बनावट स्टेशन मास्टर ओळखपत्र देखील सापडले.

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलजवळ घडला. येथे पोलीस नियमित तपासणी करत होते तेव्हा त्यांनी हे संशयास्पद वाहन रात्री ११.३० वाजता अडवले.

गाडी चालवणाऱ्या मोहम्मद आदिल याचे कसून चौकशी केली असता त्याने आपण गाडीतील चार जणांना ओळखत नसल्याचे सांगितले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. तसेच त्याने सांगितल की त्यांनी लखनऊ येथून कार भाड्याने घेतली तसेच रस्तात त्यांनी खोटी पाटी विकत घेतली, असेही पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३३६(३), ३(५) यासह कलम ३९ आणि १९२ च्या मोटार व्हेकल अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.