लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या सुटकेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिक्रिया देताना, चौघाजणांपैकी लक्ष्मीकांत आणि विजय कुमार यांना सोडविण्यात यश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, इतर दोघांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. लिबियातील सर्टे या शहरात इसिसचा मोठा प्रभाव असून गुरूवारी संध्याकाळी येथून चार भारतीय प्राध्यापकांचे अपहरण करण्यात आले होते. यापैकी दोघेजण हैदराबाद, एकजण रायचूर आणि एक प्राध्यापक बेंगुळरूमधील आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांच्याकडून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली होती. हे सर्व जण गुरूवारी त्रिपोली आणि ट्युनिसमार्गे भारताकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी सर्टे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकनाक्यावरून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेले चारही प्राध्यापक गेल्या एक वर्षापासून लिबियातील विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून भारतीय नागरिकांना लिबिया सोडण्याची सूचना केली होती. याच दहशतवादी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातून हे अपहरण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआयसिसISIS
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four indians kidnapped in libya
First published on: 31-07-2015 at 10:58 IST