पीटीआय, नवी दिल्ली : दसरा-दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. १ जुलै २०२२ पासून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही भत्तावाढ लागू होईल. ४१.८५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होईल.

बारा महिन्यांच्या महागाई निर्देशांकाच्या सरासरीने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली़  ही वाढ १ जुलैपासून लागू असल्याचे ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चार टक्के वाढीमुळे महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. महागाई भत्त्यातील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ६,५९१.३६ कोटींचा बोजा पडणार आहे. जुलैपासूनच्या पुढील आठ महिन्यांत हा बोजा ४,३९४.२४ कोटींवर जाईल.