scorecardresearch

काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार; मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त

पाकिस्तानमधून जम्मूत घुसखोरी करून ट्रकमधून काश्मीर खोऱ्याकडे निघालेले चार सशस्त्र दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले.

काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार; मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त

पीटीआय, जम्मू : पाकिस्तानमधून जम्मूत घुसखोरी करून ट्रकमधून काश्मीर खोऱ्याकडे निघालेले चार सशस्त्र दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा होता. प्रजासत्ताक दिनापूर्वी सुरक्षा दलांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.

ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून पळून गेला असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की ही चकमक ४५ मिनिटे सुरू होती. हातबॉम्ब फेकल्याने स्फोट झाले. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळील सिध्रा मार्ग परिसरातील तवी पुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास दाट धुक्यात ही चकमक सुरू झाली. लष्कराच्या ‘टायगर डिव्हिजन’चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल गौरव गौतम यांच्यासमवेत सिंह यांनी पत्रकारांना  सांगितले, की या ट्रकमधून चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडे सापडलेला सात एके रायफल, एक एम ४ रायफल, तीन पिस्तूल आणि मोठा दारूगोळा जप्त करण्यात आला.

 सिंह यांनी सांगितले, की दहशतवाद्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या सर्व सामग्रीची तपासणी, छाननी व विश्लेषण केले जात आहे.  दहशतवाद्यांच्या या गटाबद्दल माहिती नाही. ते पाकिस्तानातून घुसखोरी करून आले की नाही, याचा तपास केला जाईल. त्यांना घेऊन हा ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता. प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली माहिती व नोव्हेंबरमध्ये नरवाल मार्गावर तेल टँकरमधून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, की या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. २६ जानेवारीपूर्वी लष्कर, पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दल असे आम्ही सर्व जण मिळून विशेष सतर्कता बाळगत आहोत. सीमेवरही सुरक्षा वाढवली आहे आणि सुरक्षा दलांच्या छावण्यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  त्यामुळेच दहशतवाद्यांचा कट उधळून देऊ शकतो.

दहशतवादी संघटनेचे कमांडर सहभागी..

अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आशिक नेंगरूचे पुलवामा जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेले घर नुकतेच पाडण्यात आले. दहशतवाद्यांचा हा गट नेंगरूने पाठवला होता का, असे विचारले असता नेंगरूशी या गटाचे काही संबंध असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृत दहशतवाद्यांकडे सापडलेली एम-४ रायफलसारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहता ते जैश-ए-मोहम्मद यापैकी काही दहशतवादी संघटनेचे कमांडर असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या