एकीकडे भारतात करोना रुग्णसंख्या कमी होत असून दिलासा मिळत असताना दुसरीकडे फ्रान्समध्ये करोनाच्या पाचव्या लाटेला सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी TF1 टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत करोना संक्रमण वेगाने होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. दुसरीकडे जर्मनीतही करोना पुन्हा एकदा बळावला असून गेल्या २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, “शेजारच्या अनेक देशांमध्ये करोनाची पाचवी लाट आली आहे. मात्र आम्ही जो अनुभव घेत आहोत त्यानुसार ही स्पष्टपणे पाचव्या लाटेची सुरुवात आहे”. याआधी फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी करोनाचे ११ हजार ८८३ नवे रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. फ्रान्समध्ये सलग दोन दिवस १० हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत.




तसंच फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी करोनासंबंधी इशारा देताना ६५ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना रेस्तराँत जाण्याआधी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसंच इंटरसिटी ट्रेनमधून प्रवास करण्याआधी करोना बूस्टर डोसचं प्रमाणपत्र दाखवावं लागेल असं स्पष्ट केलं आहे. १५ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी यावेळी लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लस न घेतलेल्या ६० लाख नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. करोना अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही असा इशारा देताना मॅक्रॉन यांनी करोना तसंच थंडीच्या दिवसातील आजारांपासून नागरिकांचं रक्षण करण्याकडे सरकारकडे लक्ष असेल असं सांगितलं आहे.