एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित फ्रान्स दौऱ्यापूर्वी, आपण भारतीय नौदलाच्या पी-७५ इंडिया (पी-७५ आय) प्रकल्पात सहभागी होऊ शकणार नसल्याचे फ्रान्समधील संरक्षण क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या नेव्हल ग्रुपने म्हटले आहे. या प्रकल्पात, सहा पारंपरिक पाणबुडय़ा भारतात तयार केल्या जाणार होत्या.

 आपण ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ (आरएफपी)च्या शर्ती पूर्ण करू शकत नाही व त्यामुळे आपण लिलावातील बोलीवर कायम राहू शकत नाही, असे ४३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ‘शॉर्टलिस्ट’ करण्यात आलेल्या पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक असलेल्या या ग्रुपने सांगितले आहे.

 नव्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यात पाणबुडय़ा भारतातच तयार करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) एका भारतीय कंपनीशी भागीदारी करेल आणि तंत्रज्ञानही देईल. पी-७५ आय हा भारतातच पाणबुडय़ा तयार करण्यासाठीचा दुसरा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत नेव्हल ग्रुपने माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डिंग लि.शी भागीदारी करून कलवरी श्रेणीच्या (स्कॉर्पिअन क्लास) सहा पाणबुडय़ा भारतातच तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे.