French woman on Gurgaon garbage problem : कचऱ्याचे साचलेले ढीग, तुटलेले फुटपाथ, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि नागरिकांची उदासीनता…. गुडगाव येथील रहिवासी या सर्व समस्यांचा सामना गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. दरम्यान आता एका परदेशी नागरिकाने या भीषण परिस्थितीतबद्दल केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. एका फ्रेंच महिलेने शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या मुद्द्यावर आणि ढिळास प्रशासकीय व्यवस्थेवर केलेली सोशल मिडिया पोस्ट विचार करायला लावणारी आहे.

बऱ्याच काळापासून गुडगाव येथे राहत असलेल्या मथिल्डे आर या परदेशी महिलेने रस्ते आणि गटारांच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिने या शहराचे वर्णन एक डुकरांचे घर (a pig house) असे केले आहे, इतकेच नाही तर लोकांना येथे जनावरांप्रमाणे राहण्याची शिक्षा दिली जाते, असेही तिने म्हटले आहे. या महिलेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून या पोस्टमध्ये तिने भारतातील सर्वात महत्वाकांक्षी शहरांपैकी एक गुडगावमध्ये सध्या अत्यंत खालच्या थराला गेलेल्या नागरी व्यवस्थेबद्दल तिचे भावनिक मत व्यक्त मांडले आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये मथिल्डेने लिहिले आहे की, “जे एक आधुनिक, शांततेनं भरलेलं शहर होऊ शकलं असतं ते एक मोठी कचरा टाकण्याची जागा झालं आहे. माझे अनेक परदेशी मित्र दिल्लीला परतत आहेत किंवा परदेशात जाणे एक सुटका असेल अशा भावनेने भारत कायमचा सोडून जात आहेत.”

शहरातील अनेक भागात स्वच्छता कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत, तसेच अनेक ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यांवरून वाहताना पाहायला मिळत आहेत, यादरम्यान या महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे.

या महिलेने तिच्या पोस्टमध्ये जे लोक शहर सोडून जाऊ शकत नाहीत त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच तिने स्थानिक प्रशासनाच्या प्रामाणिकपणावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

“आम्ही भरलेल्या करातून आम्हाला चांगले जीवन देण्याऐवजी दुसऱ्यांचा घरे बांधली जात आहेत का? असा प्रश्न मला पडतो,” असेही ती म्हणाली आहे. मूलभूत कचरा व्यवस्थापनात शहराचे अपयश हे नागरिकांना संकटाकडे ढकलत आहे, असेही ती पुढे म्हणाली आहे.

“तुम्हाला खरंच वाटतं का की घाणीने भरलेल्या आणि धोकादायक रस्त्यांवर चालावे लागत असताना पर्यटकांना येथे यायला आवडेल? गुडगाव हे एका अॅडव्हेंचर पार्कचे नरकासारखे रुप बनले आहे. तुम्ही जर तुमच्या घराबाहेर पडण्याचं धाडस दाखवत असाल, तर तुम्ही गटार आणि लोकांच्या विष्ठेतून चालण्याचा प्रयत्न करू शकता, रस्त्यावर वाट शोधण्याचा प्रयत्न करताना जीव गमावू शकता किंवा कामावरून परताना तुम्हाला विजेचा झटका बसू शकतो,” असेही ती म्हणाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या पोस्टच्या खाली अनेकांनी याच्याशी सहमत असल्याची मत व्यक्त केले आहे. तर अनेकांनी अयशस्वी प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत