पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करून फरार झालेल्या उद्योगपती मेहुल चोक्सीला पुन्हा एकदा आपलं अपहरण केलं जाईल अशी भीती सतावत आहे. पुन्हा एकदा आपलं गयावा येथून बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने अपहरण केलं जाऊ शकतं असं मेहुल चोक्सीचं म्हणणं आहे. डोमिनिकात २३ मे रोजी अवैधरित्या प्रवेश केल्याने मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने भारतीय अधिकाऱ्यांनी आपलं अपहरण करुन आणल्याचा दावा केला होता.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मेहुल चोक्सीने म्हटलं आहे की, “माझ्यावर पुन्हा एकदा जबरदस्ती करत अपहरण करत गयावा येथे नेलं जाऊ शकतं, गयावा येथे भारताचे चांगले संबंध असून त्याचा फायदा घेत बेकायदेशीरपणे मला नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो”.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची संधी हुकली? जामीन मिळाल्यानतंर पुन्हा अँटिग्वात दाखल

“मी सध्या अँटिग्वामधील माझ्या घरात असून प्रकृती नीट नसल्याने मी कुठेही जाऊ शकत नाही. भारतीय अधिकाऱ्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे माझी प्रकृती अजूनच खालावली,” असा आरोप यावेळी त्याने केला आहे.

“गेल्या काही महिन्यांमध्ये बसलेले मानसिक धक्के, सतत मनात असलेली भीती मला सध्या मदतीची गरज आहे,” असंही त्याने सांगितलं आहे. पुढे त्याने म्हटलं आहे की, “डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतानाही मी घराबाहेर पाय ठेवू शकत नाही आणि प्रकाशझोतात येण्यापासून स्वत:ला दूर ठेवतो. माझ्या प्रकृतीमुळे मला काही करायला जमत नाही”. “माझे वकील अँटिग्वा आणि डोमनिकामध्ये केस लढत असून न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,” असं मेहुल चोक्सीने यावेळी सांगितलं आहे.

चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता

चोक्सी व नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गंडा घातला होता. चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. आता ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.