जपानच्या हिरोशिमा शहरात आंतरराष्ट्रीय जी-७ शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले आहेत. खरंतर भारत या शिखर परिषदेचा भाग नाही. तरी पंतप्रधान मोदी अतिथी देशाचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, जी-७ परिषदेच्या सभागृहात नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची मैत्री पाहायला मिळाली. दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. दोघांनी काहीवेळ बातचित केली आणि नंतर परिषदेत सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीदेखील भेट घेतली. दोघांनी गळाभेट घेऊन एकमेकांचं स्वागत केलं. सुनक यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेसाठी जपानमध्ये १९ मे ते २१ मे पर्यंत असतील.
