पीटीआय, मंदसौर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन योजनेंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरे अभयारण्य तयार करण्यात आले आहे. चित्त्यांच्या नवीन तुकडीचे स्वागत करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. सध्या कुनो नॅशनल पार्क येथे २१ चित्ते आहेत.
पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक एसपी यादव यांनी सांगितले की, शेओपूर जिल्ह्यातील कुनोपासून सुमारे २७० किमी अंतरावर असलेले गांधी सागर वन्यजीव अभयारण्य चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी तयार केले गेले आहे. याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये आफ्रिकन तज्ज्ञ येथे येतील आणि तयारीचा आढावा घेतील. त्यांच्या अहवालानंतर आफ्रिकेतून चित्त्यांची एक तुकडी आणण्यात येणार आहे. हे अभयारण्य ३६८ चौरस किलोमीटर परिसरात वसविण्यात आले आहे. याशिवाय २,५०० चौरस किमीचे अतिरिक्त वनक्षेत्र चारही बाजूंनी असणार आहे.
हेही वाचा >>>राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मंदसौरचे विभागीय वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्त्यांसाठीचे हे नवीन घर आहे. ते ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. गांधी सागर वन्यजीव अभयारण्यासाठी १७.७२ कोटी रुपये करण्यात आले आहेत. २५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ‘कुनो’तून चित्त्यांचे निरीक्षण आणि काळजी घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आधीच घेण्यात आल्याची माहिती वन खात्याने दिली आहे. चित्ता पुनर्वसन योजनेंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरे अभयारण्य तयार करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.