आवश्यक परवानग्या नसताना कत्तलीसाठी बेकायदपणे म्हशी वाहून नेणाऱ्या एका ट्रकच्या क्लीनरवर अज्ञात गोरक्षकांनी रविवारी रात्री उशिरा हल्ला केला. अहमदाबादच्या रामोल भागामध्ये ही घटना घडली. धारदार शस्त्राने या ट्रकच्या क्लीनरच्या छातीत वार करण्यात आले. हा ट्रक उत्तर गुजरातमधील डीसा येथून दक्षिण गुजरातमधील भरुच येथे चालला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ट्रकमध्ये ३० म्हशी होत्या. कत्तलीसाठी म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे आवश्यक परवानग्या नव्हत्या असे पोलिसांनी सांगितले. रामोल पोलिसांनी या प्रकरणी दोन एफआयआर नोंदवले आहेत. बेकायदपणे प्राणी वाहून नेल्या प्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनरविरोधात एफआयआर नोंदवला आहे तर चार अज्ञात गोरक्षकांविरोधात दुसरा एफआयआर नोंदवला आहे.

अहमदाबाद येथील रुग्णालयात क्लीनरला दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. ट्रक चालक मुस्तफा सिपायला अटक करण्यात आली आहे. अन्य चार हल्लेखोर गोरक्षकांचा शोध सुरु आहे. झाहीर कुरेशी असे जखमी क्लीनरचे नाव असून तो बनासकाठा जिल्ह्यातील डीसा येथे रहाणारा आहे. डीसा ते भरुच येथे जाण्यासाठी मुस्तफा सिपायने आपल्याला क्लीनर म्हणून सोबत येण्यास सांगितले. ट्रकमध्ये ३० म्हशी होत्या असे त्याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आपण पळण्याचा प्रयत्न केला पण दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी धारदार शस्त्राने आपल्यावर वार केला असे झाहीर कुरेशीने सांगितले. हल्ल्यानंतर आपली शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होतो असे त्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gau rakshaks stab truck conductor for illegally ferrying buffaloes
First published on: 19-11-2018 at 03:07 IST