पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी लेखक विक्रम संपत यांचा जबाब विशेष तपास पथकाने (एसआयटी) नोंदवला आहे. मी लंडनहून परतल्यावर दोन दिवसांनी विशेष तपास पथकाचे अधिकारी माझ्या घरी आले. त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी माझा जबाब नोंदवून घेतला अशी माहिती संपथ यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

एसआयटी अधिकाऱ्यांचा माझी चौकशी करण्यामागचा दृष्टीकोन मला पटला नाही. तरीही कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याने मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. मला हे मान्य आहे की मी गौरी लंकेश यांच्या विरोधात लेख लिहिला होता. मात्र या लेखाला गौरी लंकेश यांनी प्रत्युत्तरही दिले होते. एसआयटीचे अधिकारी माझ्या चौकशी आधी हा विचारही करू शकत होते. कारण गौरी लंकेश यांच्या विरोधात मी लेखन केले असले तरीही गौरी लंकेश यांच्या लिखाणामुळे माझी बदनामी झाली, असाही आरोप संपत यांनी केला आहे.

देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे असा आरोप करत २०१५ मध्ये अनेक लेखक आणि साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहिम हाती घेतली होती. याच संदर्भात गौरी लंकेश यांनी संपत यांच्याविरोधात एक लेख लिहिला होता. ज्यानंतर भरविण्यात आलेल्या बेंगळुरू साहित्य संमेलनाचे वातावरण बिघडले. काही कन्नड लेखकांनी या साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासही नकार दिला होता. ज्या लेखकांनी गौरी लंकेश यांच्यावर टीका केली होती त्या सगळ्यांना तपास पथकाकडून प्रश्न विचारले जातील का? असाही प्रश्न संपत यांनी उपस्थित केला आहे.

गौरी लंकेश या एक निडर पत्रकार होत्या, त्यांची हत्या होणे दुर्दैवी आहे. गौरी लंकेश यांनी आजवर पंतप्रधानांच्या विरोधात लिहितानाही धाडसी भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्या हत्येप्रकरणी माझी चौकशी केली जाते आहे. ज्यामुळे मी आणि माझे वृद्ध आई- वडील तणावात आहोत, या गोष्टीला काही अर्थ आहे का? असाही प्रश्न विक्रम संपत यांनी विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपत यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबरच्या रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाकडून केली जाते आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.