ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी ही घोषणा शुक्रवारी केली. ५ सप्टेंबरला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता या प्रकरणाचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

ज्या नागरिकांना याबाबत माहिती असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कर्नाटक पोलिसांनी जनतेला केले. माहिती देणाऱ्याचे नाव जाहीर केले जाणार नाही असेही आश्वासन पोलिसांनी दिली आहे. या आवाहनानंतर लगेचच कर्नाटक सरकारने ही घोषणा केली आहे.

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी असे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच मारेकऱ्यांची माहिती पुरवणाऱ्यांना १० लाखांचे इनामही आम्ही देऊ, असेही सिद्दरामय्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने दिलेल्या बातमीनुसार, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि विशेष तपास पथक यांच्यात बैठकही झाली. या पथकात एकूण २१ सदस्य आहेत. गौरी लंकेश यांचे मारेकरी लवकरात लवकर गजाआड केले जावेत याच उद्देशाने आम्ही विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. आम्ही यासंदर्भात लंकेश यांच्या कुटुंबाशीही संवाद साधला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरी लंकेश यांचे मारेकरी लवकरात लवकर पकडले जावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची खात्री लंकेश यांच्या कुटुंबियांना दिल्याचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी म्हटले आहे.विचारवंत आणि लेखक एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे या तिघांच्याही हत्येप्रमाणेच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. गौरी लंकेश यांनी भाजपविरोधी लिखाण केल्याचीही माहिती त्यांच्या हत्येनंतर समोर आली आहे. विवेकाचा आवाज पुन्हा एकदा शांत करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र काहीही झाले तरीही गौरी लंकेश यांचे मारेकरी मोकाट सुटायला नकोत अशी मागणी पोलिसांकडे नागरिकांकडून वारंवार करण्यात येते आहे.