मनीष सिसोदियांवरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून सातत्याने भाजपावर टीका केली जात आहे. भाजपाकडून दिल्ली सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असून आमच्या आमदारांना विकत घेण्यासाठी २०-२० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे. ‘आप’च्या या आरोपाला आता भाजपा नेते गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केजरीवालची तुम्हाला भाजपाकडून पंतप्रधान पदाची ऑफर तर नाही आली ना? असा टोला गंभीर यांनी लगावला आहे.

हेही वाचा – सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; गोवा पोलिसांकडून तपास सुरू

ट्वीटद्वारे गंभीर यांचा ‘आप’ला टोला

दिल्लीत सध्या भाजपा विरुद्ध आप असा संघर्ष सुरू आहे. यात आता खासदार गौतम गंभीर यांनीही उडी घेतली आहे. गंभीर यांनी एक ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे. केजरीवालजी, २०२४ साठी भाजपाने तुम्हाला पंतप्रधान पदाची ऑफर तर दिली नाही ना? असा प्रश्न गौतम गंभीर यांनी विचारला आहे.

अरविंद केजरीवालांनी बोलावली बैठक?

दरम्यान, आज केजरीवाल यांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर दिल्लीतील सरकार स्थिर असून कोणताही आमदार फुटणार नाही, असा विश्वास आप पक्षाने व्यक्त केला. असे असले तरी या बैठकीला काही आमदार अनुपस्थित होते. या आमदारांशी फोन कॉलद्वारे चर्चा झाल्याचे आप पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

gautam gambhir Tweet on Kejariwal
फोटो सौजन्य – गौतम गंभीर ट्विटर खाते

नेमकं प्रकरण काय आहे?

आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील चार आमदारांना भाजपमध्ये सामील व्हा अन्यथा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या खोट्या खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, असे लाचेचे प्रलोभन आणि धमकी भाजपतर्फे देण्यात आल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला. मतदारांना भाजपामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी २० कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जर त्यांनी इतर आमदारांना सोबत आणले तर २५ कोटीही देण्याचे प्रलोभन दाखवले होते. जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारून भाजपमध्ये जाणे नाकारले, तर मात्र उपमुख्यमंत्री सिसोदियांप्रमाणे त्यांना ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकीही भाजपाच्या या नेत्यांकडून देण्यात आली होती, असा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात येत आहे.