जम्मू काश्मीरमध्ये रविवारी लष्कराने दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने एकीकडे पाकिस्तानी सरकारने दुख: व्यक्त केलं असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीनेही दहशतवाद्यांसाठी सहानुभूती व्यक्त केली आहे. शाहीद आफ्रिदीने ट्विट करत काश्मीरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे असं म्हटलं. सोबतच संयुक्त राष्ट्र आणि इतर संघटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र यावेळी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने शेलक्या शब्दांत आफ्रिदीला सुनावलं आहे. शाहीद आफ्रिदी नो बॉलवर विकेट गेल्याचा आनंद साजरा करत आहे असा टोला गंभीरने लगावला आहे.

शाहीद आफ्रिदीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, ‘भारतव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा अंमल करणा-या शासनाकडून निर्दोषांची हत्या केली जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? हा रक्तरंजित संघर्ष रोखण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीयेत?’.

दरम्यान शाहीद आफ्रिदीच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून त्याला खडे बोल सुनावले आहेत. गौतम गंभीरनेही शेलक्या शब्दांत आफ्रिदीच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. गौतम गंभीरने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रसारमाध्यमांनी शाहीद आफ्रिदीच्या ट्विटवर प्रतिक्रिया घेण्यासाठी मला फोन केले. त्यात काय प्रतिक्रिया द्यायची? शाहीद आफ्रिदी फक्त UN कडे पाहत आहे, कारण त्याच्या डिक्शनरीत त्याचा अर्थ “UNDER NINTEEN” असा आहे. मीडियाने शांतपणे घ्यावं. आफ्रिदी नो बॉलवरील विकेट साजरा करत आहे’.

शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावरुन भारताला लक्ष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गतवर्षी त्याने केलेल्या ट्विटवरुन वाद झाला होता. काश्मीर गेल्या अनेक दशकांपासून अहिंसेचा शिकार झाल्याचं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.