Gautam Gambhir Quit Politics : दिल्ली भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणाला रामराम केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ही विनंती करणारी पोस्ट लिहिली आहे. मी आता क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रीत करु इच्छितो असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा मी आता क्रिकेटवर लक्ष्य करु इच्छितो अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीर राजकारणात सक्रिय होता. त्याने अशा प्रकारे राजकारण सोडल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होतं आहे.
काय आहे गौतम गंभीरची पोस्ट?
गौतम गंभीरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विनंती केली आहे की मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा. मी येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर लक्ष केंद्रीत करु इच्छितो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी ऋणी आहे. तसंच अमित शाह यांनीही मला जी संधी दिली आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो असंही गौतम गंभीरने म्हटलं आहे. तसंच जयहिंद असं म्हणत राजकारणातून निवृत्त होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
गौतम गंभीर पूर्व दिल्लीचे भाजपाचे खासदार आहेत. गौतम गंभीर टी २० वर्ल्ड कप २००७ आणि वन डे वर्ल्ड कप २०११ या स्पर्धांमध्ये टीम इंडियाकडून खेळला होता. गौतम गंभीर सध्या कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर आहे. गौतम गंभीरने राजकारण सोडण्याची घोषणा केल्याने आता त्याला दिल्लीतून उमेदवारी दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे. या जागेवर अक्षय कुमारला भाजपाकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.