राजस्थानमध्ये आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निडणुकीतून माघार घेतली असती तरी राजस्थानमधील राजकीय संघर्ष अद्यापही संपलेला नाही. गेहलोत समर्थीत आमदारांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मुख्ममंत्रीपदावरून राजस्थानपासून ते दिल्लीपर्यंत बैठका आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गेहलोत समर्थीत आमदारांनी “गद्दार मुख्यमंत्री होण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका चांगल्या” असे वक्तव्य केल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Congress President Election : मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पुढे येताच दिग्विजय सिंह बॅकफूटवर?
गुरुवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, अशी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी या बैठकीनंतर दिली. मात्र, गेहलोत समर्थक आमदार परसादी लाल मीणा आणि कॅबिनेट मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी पत्रकार परिषद घेत थेट सचिन पायलट यांच्यावर टीका केली आहे. ”जर मुख्यमंत्री पदाबाबत काही बदल झाला तर आम्हाला पुन्हा सामूहिक राजीनामे द्यावे लागतील. गद्दार मुख्यमंत्री झाल्यापेक्षा मध्यावधी निवडणुका केंव्हाही चांगल्या”, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने राजस्थानमधील नेत्यांच्या वक्तव्यांवरून नाराजी व्यक्त केली आहे. अशी वक्तव्ये सुरू राहिल्यास नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एका पत्रक जारी करत राजस्थानमधील नेत्यांना सुनावले आहे.