भारताचे प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणाली असलेल्या ‘सुदर्शन चक्र’मध्ये सेन्सर्स, क्षेपणास्त्रे, देखरेख उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांचे मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण केले जाणार आहे, असे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी सांगितले. ही संरक्षण प्रणाली देशासाठी ढाल आणि तलवार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ‘सुदर्शन चक्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विस्तृत रूपरेषा स्पष्ट केली. ‘सुदर्शन चक्र’ हे इस्रायलच्या ‘आयर्न डोम ऑल-वेदर एअर डिफेन्स सिस्टीम’च्या धर्तीवर असेल, ज्याला अतिशय प्रभावी क्षेपणास्त्र ढाल म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात १० वर्षांच्या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर महू येथे झालेल्या संरक्षण परिषदेत जनरल चौहान यांनी प्रस्तावित क्षेपणास्त्र ढालवर केलेले भाष्य हे लष्कराकडून आलेले पहिलेच भाष्य आहे. युद्ध आणि युद्धविषयक त्रि-सेवा चर्चासत्र ‘रण संवाद’ येथे आपल्या भाषणात जनरल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरचा थोडक्यात आढावा घेतला आणि सांगितले की या संघर्षातून अनेक धडे शिकले आहेत आणि ते अमलात आणले जात आहेत. ‘सुदर्शन चक्र’चे वर्णन त्यांनी भारताचे स्वतःचे ‘आयर्न डोम’ किंवा ‘गोल्डन डोम’ असे केले.