वृत्तसंस्था, मिलान (इटली)
सर्जनशील संकल्पनेला अब्जावधी डॉलरच्या फॅशन साम्राज्यात रूपांतरित करणारे इटालियन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांने गुरुवारी मिलान येथे वयाच्या ९१ वर्षी निधन झाले. वृद्धापकाळामुळे ते काही दिवसांपासून आजारी होते. मात्र अखेरच्या दिवसांपर्यंत ते त्यांच्या कंपनीच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होते, अशी माहिती ‘अरमानी ग्रुप’ने दिली.
जागतिक फॅशन उद्योगात ख्याती असलेले जॉर्जियो अरमानी हे जूनमध्ये झालेल्या ‘मिलान फॅशन वीक’ला आजारपणामुळे पहिल्यांदाच अनुपस्थित राहिले. या महिन्यात मिलान फॅशन वीकदरम्यान जॉर्जियो अरमानी फॅशन हाऊसला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मोठ्या कार्यक्रमाची योजना आखत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
अस्तररहित जॅकेट, साध्या विजारीपासून सुरुवात करून अरमानी यांनी १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय फॅशन नकाशावर ‘इटालियन रेडी-टू-वेअर’ शौली ठेवली. गेल्या ५० वर्षांत त्यांच्या सर्जनशील शैली व डिझाइनने फॅशन जगतात दबदबा निर्माण केला. फॅशन क्षेत्रातील विविध ब्रँड निर्माण करून त्यांनी १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्तीचे साम्राज्य उभे केले, ज्यामध्ये कपड्यांसह ॲक्सेसरीज, घरगुती फर्निचर, परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने, पुस्तके, फुले आणि अगदी चॉकलेटचा समावेश आहे. त्यामुळेच फोर्ब्जच्या यादीनुसार ते जगातील आघाडीच्या २०० अब्जाधीशांमध्ये स्थान मिळवू शकले.
जीन्स, टी-शर्टमध्ये कलात्मकता
जॉर्जियो अरमानी हे अनेक बार, क्लब, हॉटेल, उपाहारगृहांचे मालक होते. त्यांचा स्वत:चा बास्केटबॉल संघही होता, जो ‘ऑलिंपिया मिलाने’ म्हणून ओळखला जातो. अरमानीने १९९८ पासून मिलान ते टोकियोपर्यंत २० हून अधिक उपाहारगृहे आणि दोन हॉटेल सुरू केली. जीन्स, टी-शर्टपासून घरांच्या सजावटीपर्यंत फॅशन क्षेत्रात त्यांनी कलात्मकता आणली.