तेहलकाच्या संपादकांनी सहकारी महिला पत्रकारावर बलात्कार केल्याच्या कथित प्रकरणानंतर आता दिल्ली येथील एका विद्यार्थिनीने गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यावेळी  लैंगिक छळवणूक झाल्याचा आरोप केला आहे. चित्रपट महोत्सवाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे दुष्कृत्य केल्याचे तिने म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने चित्रपट महोत्सवाचे संचालक शंकर मोहन यांच्यासमवेत एक तक्रार दाखल केली असून त्यात एका उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्याविषयी गलिच्छ वक्तव्य केले व अप्रत्यक्षपणे लैंगिक सुख मागितले, अशी या विद्यार्थिनीची तक्रार आहे.
सदर व्यक्तीने १६ नोव्हेंबर २०१३ च्या रात्री आपल्याबाबत गलिच्छ भाषेत काही सूचक वक्तव्ये केली व अप्रत्यक्षपणे लैंगिक सुख मागितले, असे तिने १७ नोव्हेंबरला दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेमुळे आपल्याला त्रास झाला व त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध व निवारण) कायदा २०१३ अन्वये तक्रार दाखल केल्याचे या २५ वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दक्षिण आशिया व जागतिक चित्रपट विभागाला मदत करण्यासाठी ही तरुणी गोव्याला गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार सदर अधिकाऱ्याने आपल्याला जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील कक्षात बोलावले, त्या वेळी सायंकाळ उलटून गेली होती व दारू पिण्यास आपल्यासोबत येण्यास त्यांनी सुचवले. सदर विद्यार्थिनीने या अधिकाऱ्यांनी त्यानंतर वारंवार सूचक वक्तव्य केल्याचे म्हटले असून हा अधिकारी त्याच्या कक्षातील सीसीटीव्ही सुविधेचा वापर वेगळाच आनंद मिळवण्यासाठी करीत होता, असे तिचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयातील चित्रपट संचालक निरूपमा कोत्रू यांचा समावेश असलेली तीन सदस्यांची समिती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने नेमली आहे.
संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणी समितीसमोर तोंडी माफी मागितली असून लेखी माफी मागितलेली नाही. आम्ही काही सूचना केल्या असून हे प्रकरण मिटले आहे, असे समितीने या विद्यार्थिनीला सांगितले. मात्र दरम्यान पालकांच्या सांगण्यानुसार ती दिल्लीत परतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl alleged abuse by officials in goa film festival
First published on: 23-11-2013 at 01:03 IST