नवी दिल्ली : स्पाइसजेटचे ९० वैमानिक योग्यरीत्या प्रशिक्षित नसल्याचे आढळल्यानंतर, देशातील हवाई वाहतूक नियंत्रक असलेल्या डीजीसीएने त्यांना बोइंग ७३७ मॅक्स विमानाचे उड्डाण करण्यास प्रतिबंध केला आहे.

 ‘या वैमानिकांवर मॅक्स विमान उडवण्यापासून आम्ही सध्यापुरती बंदी घातली असून, हे विमान उडवण्यासाठी त्यांना पुन्हा यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल’, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी एका निवेदनात सांगितले. या त्रुटीसाटी जबाबदार असलेल्यांविरुद्ध डीजीसीए कठोर कारवाई करेल, असेही ते म्हणाले. या वैमानिकांना मॅक्स विमानाच्या स्टिम्युलेटरवर योग्य पद्धतीने पुन्हा प्रशिक्षणास सामोरे जावे लागणार आहे. डीजीसीएने १३ मार्च २०१९ रोजी मॅक्स विमाने भारतात उतरवली होती. याच्या तीन दिवस आधी इथिओपियन एअरलाइन्सच्या ७३७ मॅक्स विमानाला अपघात होऊन त्यात १५७ लोक मरण पावले होते.