लॅक्टोजचे पथ्य असलेल्यांना उपयोगी
नैसर्गिकरीत्या गोड असलेले दही (योगर्ट) तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. दही तयार करणाऱ्या जीवाणूंमधील चयापचयाचे गुणधर्म बदलून या दहय़ात साखरेचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. लॅक्टोजसुद्धा सूक्ष्मजीवशास्त्रीय पद्धतीने काढण्यात आले असून, लॅक्टोजचे पथ्य असलेल्यांनाही या दहय़ाचा आस्वाद घेता येईल. दहय़ातील जीवाणूंमध्ये बदल घडवताना ते ग्लुकोज तयार करणार नाहीत अशी खबरदारी घेण्यात आली आहे. ग्लुकोज हा किण्वन क्रियेत तयार होणारा एक घटक आहे, असे हॅनसेन होल्डिंगचे एरिक जोहान्सन यांनी सांगितले. काही देशांत दही (योगर्ट) बनवताना त्यात स्ट्रेप्टोकॉकस थमोफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी बलगॅरिकल या जीवाणूंचा समुच्चय असतो. जेव्हा हे जीवाणू दुधात वाढतात तेव्हा लॅक्टोजचे विघटन करतात. लॅक्टोज हे डायसॅकराइड असते ते मोनोसॅकराइड बनताना ग्लुकोज व गॅलॅक्टोज तयार होते.
जीवाणू ग्लुकोज खातात व गॅलॅक्टोज स्रवतात. पण जीवाणूंनी गॅलॅक्टोज खाऊन ग्लुकोज स्रवावे यासाठी आम्ही त्यांच्या चयापचयात बदल केला. त्यात एस थर्मोफिलस हे एका माध्यमात वाढवले जातात. त्यात गॅलॅक्टोज हा एकच अन्नघटक असतो. त्यामुळे जीवाणूंना वाढीसाठी गॅलॅक्टोज खाण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे या जीवाणूंचे गॅलॅक्टोज खाणारे प्रकार आम्ही शोधले आहेत. आता त्या जीवाणूत सुधारणा करून ते कधीच ग्लुकोज खाणार नाहीत व त्यांच्या पेशीतही ग्लुकोज कधीच जाणार नाही अशी व्यवस्था केली जाणार आहे. २ डिऑक्सिग्लुकोज या माध्यमात हे जीवाणू वाढवण्यात आले ते जीवाणूंच्या पेशींना मारक असते.
या जीवाणूंचे काही प्रकार या माध्यमात जिवंत राहतात. त्यांच्यात ग्लुकोजच्या चयापचयाची क्षमता असते.
दुसऱ्या फेरीत २ डिऑक्सिग्लुकोजची जास्त क्षमतेच्या पातळीवर निवड केली जाते. त्याचा वापर करून लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस या जीवाणूचे पेशीत ग्लुकोज वाहून न नेणारे प्रकार शोधण्यात आले. त्यामुळे एस थमारेफिलसमुळे तयार झालेले ग्लुकोज जीवाणू खाणार नाहीत अशी व्यवस्था झाली.
आता तयार केलेले दही जैवतंत्रज्ञानाने बदल केलेल्या जीवाणूंच्या मदतीने तयार केले आहे. त्यात लॅक्टोजचे प्रमाण कमी आहे व गॅलॅक्टोजही फार नाही, पण तरी त्यात ग्लुकोज अधिक असून ते गोड आहे. त्यामुळे त्यात सुक्रोज म्हणजे नेहमीची साखर २० टक्के कमी लागते. दही-श्रीखंड यात साखर वापरावी लागते, त्याचे प्रमाण कमी करता येणार आहे असे यातून दिसते.
जोहान्सन यांच्या मते ग्लुकोज हे लॅक्टोज व गॅलॅक्टोजपेक्षा तुलनेने जास्त गोड असते, त्यामुळे दहय़ातील नैसर्गिक ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याने त्यात गोडपणा आणण्यासाठी कमी साखर टाकावी लागणार आहे.
जर्नल अ‍ॅप्लाइड अँड एनव्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.