Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात दररोज अनेक महत्वाच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत असते. त्यापैकी अनेक प्रकरणाचा निकाल देखील दररोज लागत असतो. अनेकदा याचिकाकर्त्यांना न्यायालय सल्ला देतानाही पाहायला मिळतं. आता अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एका जोडप्याला सुनावणी दरम्यान दिलेला एका सल्ला चर्चेत आला आहे. जेवणासाठी किंवा कॉफीसाठी जा आणि नंतर पुढचा विचार करा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने एका जोडप्याला दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका जोडप्याच्या घटस्फोट आणि मुलाच्या खटल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सल्लागाराची भूमिका बजावली. एक फॅशन उद्योजक असलेल्या पत्नी आणि एक प्रसिद्ध पॅकेज्ड फूड कंपनीचा मालक असलेल्या पतीमध्ये वाद सुरु आहे. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. हे दोघे घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहेत आणि ते २०२३ पासून वेगळे राहत आहेत.
आता पत्नीला तिच्या ३ वर्षांच्या मुलीबरोबर युरोपला जायचं आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी हवी आहे. मात्र, पतीने पत्नीच्या प्रवासाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे, तर पत्नीला मुलाला परदेशात घेऊन जाण्याची परवानगी दिली तर ते गायब होतील असा युक्तिवाद पतीने न्यायालयात केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या जोडप्याला आज एकत्र एक कप कॉफी प्या, असा सल्ला दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा वकिलांना या मुद्द्यांवर चर्चा न करता कॉफी किंवा डिनरच्यावेळी यावर विचार करण्यासही न्यायालयाने सांगितलं आहे. खंडपीठाने या जोडप्याला विचारलं की, ते अद्याप घटस्फोटित झालेले नसतानाही मुलासह एक आठवडा एकत्र का प्रवास करू शकत नाहीत? तसेच दोन्ही पक्षांमध्ये गंभीर मुद्दे प्रलंबित आहेत. पण आम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहत असल्याचं खंडपीठाने म्हटलं.
पण पतीने आग्रह धरला की त्यांना मुलाचा पासपोर्ट ताब्यात हवा आहे. जेणेकरून मूल भारतात परत येईल. त्याने असा युक्तिवादही केला की पत्नी तिच्या कुटुंबासह प्रवास करू शकते, तर मूल मुंबईत आजी-आजोबांबरोबर राहू शकतं. यावर महिलेच्या वकिलांनी म्हटलं की जर पतीला हवं असेल तर ते मध्यस्थीसाठी तयार आहेत. पण जून आणि जुलैमध्ये मुलाच्या नियोजित सुट्टीला त्यांनी रोखू नये असा युक्तिवाद त्या महिलेच्या वकिलांनी केला.
पत्नीने न्यायालयाला असंही सांगितलं की तिला पतीने त्यांच्याबरोबर युरोपला प्रवास करू नये असं वाटत होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जोडप्याला भविष्याचा विचार करावा आणि कुरघोडी सोडून द्यावी असं सुचवलं. तसेच खंडपीठाने त्या जोडप्याला काही वेळ एकत्र घालवण्यास सांगितलं आहे.