पणजी महापालिका निवडणुकीत झालेला पराभव म्हणजे भाजपची पीछेहाट झाली असे म्हणता येणार नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका लवकर घेण्याची शक्यता फेटाळताना पुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व कुणी करायचे हे भाजपचे केंद्रीय नेते ठरवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
पार्सेकर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की विधानसभा निवडणुका या वर्षी होणार नाहीत. त्या पुढील वर्षी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पूर्वार्धात होतील. भाजपने गोव्यात सत्तेची चार वर्षे आता पूर्ण केली आहेत. ९ मार्च २०१२ रोजी भाजपने निवडणुका जिंकल्या व मनोहर र्पीकर मुख्यमंत्री झाले होते. नंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये ते केंद्रात संरक्षणमंत्री झाले.
नेतृत्वाच्या प्रश्नावर पार्सेकर यांनी सांगितले, की गोव्यात मुख्यमंत्री म्हणून कुणाच्या नावाची घोषणा करायची हे पक्षाच्या धोरणानुसार केंद्रीय नेते ठरवतील. २०१२ मध्ये र्पीकर यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते व त्यावेळी पक्षाला बहुमत मिळाले होते. २०१७ मध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणे ही मी माझी जबाबदारी समजतो. पणजी महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्यावर विचारले असता ते म्हणाले, की पणजी महापालिकेतील पराभवामुळे भाजपची पीछेहाट झाली असे मी मानत नाही. गोवा महापालिकेत मॉन्सेरात यांच्या पॅनेलला १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या. काँग्रेसला नऊ वॉर्डात विजय मिळाला होता. गेल्या वेळी आमचे १३ नगरसेवक होते व आताही ती संख्या कायम राखली आहे, या निकालाचा पणजी विधानसभा मतदारसंघावर परिणाम होणार नाही, त्याचे प्रतिनिधित्व र्पीकर करीत होते.