पेट्रोलच्या मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) सवलत देण्याचा निर्णय अंमलात आणल्यामुळे गोवा सरकारच्या महसुलात चांगलीच घट झाली असून महसुलाची ही रक्कम १५७ कोटी रुपयांवरून जेमतेम एक कोटी रुपयांवर घसरली आहे.
गोवा विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या तपशिलावरून ही बाब स्पष्ट झाली असून सन २०१२-१३ च्या आर्थिक वर्षांत पेट्रोलच्या मूल्यवर्धित कराद्वारे सरकारला केवळ ९० लाख ९६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सन २०११-१२ च्या आर्थिक वर्षांत हेच उत्पन्न १५७ कोटी रुपयांच्या घरात होते. विद्यमान आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच पाच महिन्यांत पेट्रोलवरील ‘व्हॅट’ वसुलीतून सरकारला केवळ ३७ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पेट्रोलवरील ‘व्हॅट’ २० टक्क्यांवरून अवघा ०.१ टक्के केला. त्यामुळे पेट्रोलच्या प्रति लीटर दरात तब्बल ११ रुपयांची घट झाली. हे करताना गोवा सरकारने डिझेलच्या ‘व्हॅट’मध्ये घट केलेली नाही.