सोन्याच्या तस्करीत २०१२-१३ या वर्षांच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये पाच पटींनी वाढ झाली आहे. आयातीत सुलभता आणली असूनही सोन्याची तस्करी चालूच असून, ११२० कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
महसूल गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या तस्करीत होणारी वाढ ही चिंताजनक असून, सोन्याच्या आयातीवरील कायदेशीर र्निबध कमी असतानाही त्याचा काही परिणाम झालेला नाही. एकूण ४४०० प्रकरणांत सोन्याची तस्करी केल्याचे दिसून आले असून, २०१४-१५ या वर्षांत ४४८० किलो म्हणजे ४.४८ मेट्रिक टन सोने पकडण्यात आले. त्याची किंमत ११२० कोटी रुपये असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे. सोने तस्करीच्या प्रकरणांमध्ये एकूण २५२ जणांना अटक करण्यात आली आहे.
२०१२-१३ मध्ये सोने तस्करीतील ८७० प्रकरणे घडली तर २०१४-१५ या वर्षांत हे प्रमाण पाचपट वाढले. २०१३-१४ मध्ये अशी २७०० प्रकरणे घडली, त्यात २७६० किलो सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत ६९० कोटी रुपये होती. सोन्याची आयातही वाढली असून, देशांतर्गत मागणीमुळे २०१४-१५ मध्ये १३३२ मेट्रिक टन सोने आयात करण्यात आले. त्याची किंमत २.६७ कोटी रुपये होती. २०१३-१४ मध्ये १.५५ लाख कोटींचे ६१६ मेट्रिक टन सोने आयात करण्यात आले. या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ३८६०८ कोटींचे १६८ मेट्रिक टन सोने आयात करण्यात आले. सोन्याची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत आहे, त्यामुळे सोने तस्करीत १ किलो सोन्यापासून दीड लाख रुपये मिळतात, त्यामुळे तस्करी केली जाते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.