सोन्यावरील आयातशुल्कात १० टक्के वाढ झाल्यामुळे केरळमध्ये सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाल्याचे मत सोने व्यवसायाकडून मांडले जात आहे. एक वर्षांच्या कालावधीत केरळमधील विविध ठिकाणच्या विमानतळांवरून मोठय़ा प्रमाणात सोने तस्करी पकडण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत तिरूवनंतपुरम, कोची, कोझिकोडे विमानतळांवरून ९० ते १०० किलो सोने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी प्रवाशांकडून जप्त केल्याची नोंद झाली आहे.
वेगवेगळ्या आकारांतील सोने, वितळलेल्या स्वरूपातील सोने विमान प्रवाशांकडून जप्त करण्यात आले असून त्यापैकी बहुतांश प्रवासी दुबईहून आले होते. सोन्याच्या आयातशुल्कात झालेली वाढ आणि सोने आणण्यावरील बंधने यामुळे सोन्याच्या तस्करीत वाढ झाली असून गेल्या काही महिन्यांपासून केरळ राज्यांतील सर्व विमानतळांवर अशा तस्करांना मुद्देमालासह पकडण्यासाठी सीमाशुल्क विभाग दक्षता घेत आहे, अशी माहिती कोचीचे सीमाशुल्क आयुक्त के. एन. राघवन यांनी दिली.   सोन्याच्या आयातीमध्ये कपात करणे आणि वित्तीय तूट कमी करणे यासाठी सरकारने सोने आयात शुल्क वाढविले.