तुतारी वादनाला एक हजार रुपये; तर सनई-चौघडा वादनासाठी तीन ते सात हजार दर

निवडणुकीतील  रोजगार

शिवाजी खांडेकर, पिंपरी

प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करणे, सभेसाठी मतदारांना सभास्थळी पोहोचविणे आणि नंतर घरी नेऊन सोडणे, प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रवासाची व्यवस्था करणे आदी कामांसाठी वाहनांचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे वाहन चालकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय प्रचार फेरीमध्ये तसेच सभांमध्ये तुताऱ्या, सनई चौघडा वादक आणि सभेसाठी मंडप बांधणाऱ्या मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी होणार आहे. कोपरा सभा, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांना मतदारांची गर्दी जमविण्यासाठी वाहनांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तो वाढला आहे.

दोन्ही मतदार संघाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने कार्यकर्त्यांना प्रचारासाठी फिरताना वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे वाहन चालकांना निवडणुकीच्या काळात सुगीचे दिवस आले आहेत. छोटा हत्ती, जीप, टेम्पो, ट्रक, बस आदी वाहनांचा वापर केला जात असून वाहनांची आसनक्षमता, आकार पाहून वाहनांचे भाडे ठरविले जाते. इंधन खर्च उमेदवाराने केला तर दिवसाच्या भाडय़ाचा वाहनाचा दर ठरावीक असतो.

 

दिवसाला पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजारांपर्यंत वाहनांचे भाडे दिले जात आहे. कार्यकर्त्यांच्या वापरासाठीची वाहने सकाळी आठ पासून ते रात्री अकरापर्यंत उमेदवारांच्या ताब्यात दिली जातात.

मंडपाचे दर क्षेत्रफळानुसार ठरविले जाते. मंडप बांधण्यासाठी मजूर लागतात. एका सभेच्या मंडप बांधणीचे काम किमान पाच ते जास्तीत जास्त १० ते १५ मजुरांना करावे लागते. सर्वसाधारणपणे या कामासाठी सहाशे रुपये रोज दिला जात आहे. प्रचार संपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या उमेदवाराच्या सभा ठरलेल्या असतात. त्यामुळे किमान पंधरा दिवस मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

राजकीय नेत्यांच्या सभेत सनई चौघडे वाजविण्यासाठी तसेच प्रचार सभेमध्ये तुताऱ्या वादन करणाऱ्या वादकांनाही निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध होत आहे. तुतारी वादनाला तासावर पैसे घेतले जातात. ते दर एक हजार रुपयांपासून सुरू होतात. सनई चौघाडा वादनासाठी सभेच्या कालावधीनुसार तीन ते सात हजार रुपये असा दर आकारला जात आहे.

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून वाहनांना मागणी वाढते. अंतर आणि वाहनाची आसनक्षमता पाहून वाहनांचे भाडय़ाचे दर आकारले जातात. या माध्यमातून वाहन चालकांना रोजगार उपलब्ध होत आहे.

एकनाथ जानकर, मालक, आरुष कागरे, संभाजीनगर, चिंचवड

निवडणुकीच्या काळात सनई, चौघाडा, तुताऱ्या वादनासाठी उमेदवारांकडून मागणी होत असते. सभेच्या वेळेनुसार वादनाची बिदागी ठरलेली असते.

शेखर पाचंगे, सनई चौघाडा वादक, दापोडी