जगभरात आलेल्या मंदीचा फटका मोठमोठ्या कंपन्यांना बसतो आहे. त्यामुळे अनेक प्रतिथयश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कुठलीही नोटीस न बजावता कामावरून काढून टाकत आहेत. कामावरून कुठलीही पूर्वसूचना न देता काढण्यात आलेले कर्मचारी सोशल मीडियावर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. काही कर्मचारी तर असे आहेत ज्यांनी १५ ते २० वर्षे त्याच कंपनीत काम केलं आहे. तरीही त्यांना काढण्यात आलं आहे. गुगल या प्रतिथयश कंपनीने आत्तापर्यंत १२ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवलं आहे. अशात एका गुगलवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
पॉल बेकरने LinkedIn वर पोस्ट करत व्यक्त केलं दुःख
पॉल बेकर असं काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याने Linkedin वर पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये पॉल म्हणतो मी गुगल कंपनीत व्हिडिओ प्रॉडक्शन मॅनेजर या पदावर काम कत होतो. माझ्या आईला कर्करोग झाला. त्यामुळे मी सुट्टी घेतली होती. मी माझ्या आईची सेवा करत होतो आणि मला काढून टाकण्यात आलं. मी लॅपटॉपवरून लॉग इन करायला गेलो आणि मला समजलं की माझं अकाऊंट डिलिट झालं आहे. मला कंपनीने कोणतीही सूचना न देता काढून टाकलं.
पॉलने काय म्हटलं आहे?
LinkedIn वर पॉलने एक पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहेत. १२ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या भावूक पोस्ट वाचल्यानंतर आज माझ्यावरही अशीच पोस्ट लिहिण्याची वेळ आली आहे. मी आज तुम्हाला माझी व्यथाच सांगतो आहे. माझ्या आईला कर्करोग झाला, त्यामुळे मी सुट्टी घेतली. मात्र अचानक मला समजलं की मला कंपनीने काढून टाकलं आहे. गुगलमध्ये ओव्हर स्टाफ म्हणजेच गरजेपेक्षा जास्त कर्मचारी होते, त्यामुळे काहीतरी पावलं उचलली जातील याची कुणकुण लागली होती. Cost Cutting च्या नावाखाली असं काहीतरी घडेल याचा अजिबात अंदाज नव्हता. मी गुगल अॅड्सचा भाग होतो त्यामुळे मला वाटलं होतं की माझी नोकरी जाणार नाही. कारण गुगल अॅड्स हा कंपनीच्या रेव्हन्यूचा मुख्य भाग आहे. मी त्याच विभागात काम करत होतो. पण मलाही काढून टाकलं गेलं आहे. २० जानेवारीला गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एक ईमेल करून सांगितलं होतं की आम्ही १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे.
पॉलने पुढे असंही म्हटलं आहे की कंपनीने कर्मचारी कपात करणं ही बाब मनाला लागण्यापेक्षा ज्या परिस्थितीत कपात गेली ती परिस्थिती जास्त मनाला लागणारी आहे. हे म्हणजे तुम्हाला खूप लागलं आहे तरीही कुणीतरी तुम्हाला थोबाडित ठेवून दिली आहे असं आहे.मी डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीत काम करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये माझ्या आईला कॅन्सर झाला. आईचा आजार खालावत गेला म्हणून मी सुट्टी घेतली होती. मी एकीकडे माझ्या आईच्या किमो थेरेपीला सामोरा जात होतो आणि दुसरीकडे माझी नोकरी गेली. एखादी नोकरी मला परत मिळेलही पण आई वडील एकदाच मिळतात आणि त्यांचा मृत्यूही एकदाच होतो असंही पॉलने म्हटलं आहे.