चीनने भारताचा भूभाग बळाकावल्याचे सत्यही केंद्र सरकारने मान्य करावे, अशी मागणी करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, सीमेवरील परिस्थिती हाताळण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी पुन्हा लक्ष्य केले.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी चीनच्या कथित घुसखोरीप्रकरणी पंतप्रधानांवर टीका केली आणि चीनने भारतीय भूमी बळकावल्याचे सत्य सांगण्याचे आव्हान दिले.

चीन सीमेवरील परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडले असून त्याने देशाच्या प्रादेशिक एकात्मतेशी तडजोड केल्याचा आरोपही राहुल यांनी केला. शेतकरी आणि विरोधी पक्षांची कृषी कायदे मागे घेण्याची मागणी मोदी सरकारने मान्य केली, त्याप्रमाणेच चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचे सत्यही आता मान्य करावे, असे ट्वीट संदेशात राहुल यांनी म्हटले आहे.

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या वर्षी १५ जूनला झालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाबाबत राहुल गांधी सातत्याने प्रश्न विचारत आहेत.

भारत-चीन चर्चेची १४ वी फेरी लवकरच

पूर्व लडाख भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून संपूर्ण सैन्य माघार घेण्याबाबत भारत आणि चीनमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेची १४ वी फेरी लवकरच होणार आहे. दोन्ही देशांमध्ये त्याबाबत गुरुवारी सहमती झाली आहे.