दिल्ली शहरातील म्हणजेच एनसीआर खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये करोना साथीच्या काळात स्थानिक रुग्णांवरच उपचार करण्यात येतील अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. करोनासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये इतर जवळच्या भागांमधून येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार नसल्याचे सांगत स्थानिक रुग्णांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचे स्पष्ट केलं. काही विशेष शस्त्रक्रीयांसाठी दिल्लीबाहेर आलेल्या रुग्णांवर केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपचार केले जाणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“दिल्लीमधील ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी करोना साथीच्या काळामध्ये दिल्लीतील लोकांवरच येथील रुग्णालयांमध्ये उपचार केले जावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळेच या पुढे दिल्लीतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये स्थानिक रुग्णांवरच उपचार केले जाणार आहेत. इतर शहरांमधून दिल्लीमध्ये शस्त्रक्रीया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यास त्यांना खासगी रुग्णालयामध्येच उपचार घ्यावे लागतील,” अशी माहिती केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दिल्ली सरकार सोमवारपासून (आठ जूनपासून) उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्याला लागून असणाऱ्या सीमांवरील निर्बंध उठवणार असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. सोमवारपासून या सीमांवरुन सामान्यपणे वाहतूक सुरु होणार असल्याचे संकेत केजरीवाल यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर केंद्र सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांनुसार दिल्लीमधील अनेक सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. “दिल्लीमधील मॉल, रेस्तराँ, धार्मिक स्थळे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार सुरु करण्यात येणार आहेत,” असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

एकीकडे रेस्तराँ सुरु करण्यात येणार असले तरी मोठी हॉटेल आणि बॅक्वेट हॉल्स बंदच ठेवली जाणार असून यामागील कारणही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.”हॉटेल्स आणि बँक्वेट बंदच राहणार असून भविष्यात या जागी रुग्णालयांसारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात,” असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे.हाच भार हलका करण्यासाठी केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये रविवार दुपारपर्यंत (७ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत) २६ हजार ३३४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७०८ इतकी आहे.