भारतातील किराणा व्यापार क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च करणाऱ्या वॉलमार्टच्या लॉबिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी केली. पण, वॉलमार्टप्रकरणी देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्याची न्यायालयीन किंवा संयुक्त संसदीय समितीद्वारे कालबद्ध चौकशी करून सत्य देशापुढे मांडले पाहिजे, अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घालून लोकसभेचे कामकाज बंद पाडले.
भारतात लॉिबगवर कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या वॉलमार्टच्या लाचखोरीची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेस, अण्णाद्रमुक, जनता दल युनायटेड आणि राजदने केली, तर या प्रकरणाची साठ दिवसांमध्ये न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. वॉलमार्टच्या लॉिबगची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेची घोषणा करून महिन्याभरात अहवाल सादर करण्यात यावा आणि समितीपुढे वॉलमार्टलाही पाचारण करण्यात यावे, अशी मागणी लालूप्रसाद यादव यांनी केली.
सभागृहाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावरून कमलनाथ यांना याप्रकरणी चौकशीची घोषणा करण्याचे निर्देश दिले. कमलनाथ यांनी तशी घोषणाही केली, पण या घोषणेमुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकार आणि वॉलमार्ट निषेधाच्या घोषणा देत गोंधळ सुरूच ठेवल्याने अध्यक्ष मीरा कुमार यांना लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यास भाग पडले.
राज्यसभेतही या प्रकरणावरून गोंधळ झाला. सभापती हमीद अन्सारी यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
वेंकय्या नायडू (भाजप)
भारतात लॉिबगचा अर्थ लाच देणे असा होतो. किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीविषयी भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकन लोकप्रतिनिधींवर वॉलमार्टने पैसा खर्च केला आहे. लाच देणे आणि दडपणाखाली झुकणे असे या प्रकरणाचे दोन पैलू आहेत. मनमोहन सिंग सरकारने त्यावर विस्तृत स्पष्टीकरण देऊन चौकशीची घोषणा करावी.
सीताराम येचुरी (माकप)
सत्ताधारी काँग्रेसने संसदेत वॉलमार्टच्या पैशाने बहुमत संपादन केले काय, याची चौकशी करण्याची गरज आहे. भारतात लॉिबगचा प्रकार बेकायदेशीर आहे, पण यापूर्वी राजकीय नेत्यांच्या ‘शिक्षणा’वर एन्रॉननेही असाच पैसा खर्च केला होता. या मुद्द्यावर विस्तृत चर्चेसाठी माकप राज्यसभेत नियम १७६ अंतर्गत नोटीस देणार आहे.
यशवंत सिन्हा (भाजप)
ल्युटियन नावाच्या ब्रिटिश वास्तुविशारदाने संसद भवन आणि राष्ट्रपती भवनासह नवी दिल्लीच्या परिसराचा नकाशा बनविला. त्यामुळे या परिसराला लुटियन्स दिल्ली म्हणतात. हे नाव आज यथार्थ ठरले आहे. येथे लूट सुरू आहे. काही लोक देशाला आणि या शहराला लुटण्यात गुंतले आहेत. वॉलमार्टच्या लाचखोरीनंतर आता लुटियन्स दिल्लीऐवजी या परिसराला लुटिहन दिल्ली असे संबोधले पाहिजे.  
गुरुदास दासगुप्ता (भाकप)
लाच त्याच व्यक्तीला दिली जाते जी व्यक्ती निर्णय घेऊ शकते. जिच्यापाशी बहुमत आहे. प्रस्ताव पारित करण्याची क्षमता आहे. किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव कुठल्यातरी मोबदल्यात पारित झालेला आहे. सरकारवर संशयाची ढगे दाटली आहेत.
सौगत राय (तृणमूल काँग्रेस)
यूपीए सरकारच्या चेहऱ्यावरील लाली वॉलमार्टची आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government ready for walmart enquery
First published on: 12-12-2012 at 03:38 IST