दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना मी दोघांना व्यापार बंदीची धमकी दिल्याने दोन्ही देशांनी शस्त्रविराम पुकारला, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केले. अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी का केली असा प्रश्न चर्चेत आलेला असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, यावर आता खुद्द भारत सरकारनेच प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे.

“७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबतच्या निर्णयापर्यंत भारतीय आणि अमेरिकन नेत्यांमध्ये विकसित होत असलेल्या लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. पण या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा आला नाही”, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले होते?

“तुम्हाला हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व अढळ आणि शक्तिशाली होते. दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्याकडे परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि धैर्य होते. आम्ही खूप मदत केली आणि व्यापारातही मदत केली. मी म्हणालो आम्ही तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहोत. त्यामुळे तणाव थांबवूया. जर तुम्ही ते थांबवले तर आम्ही व्यापार करत राहू. जर तुम्ही थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प काल अमेरिकेच्या माध्यमांसमोर म्हणाले.

अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही

या तणावादरम्यान अणुयुद्धाची भीतीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवलेली. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आमच्या बाजूने लष्करी कारवाई पूर्णपणे पारंपारिक क्षेत्रात होती. पाकिस्तान नॅशनल कमांड अथॉरिटी १० मे रोजी बैठक घेईल, असंही वृत्त होतं. परंतु नंतर त्यांनी हे वृत्त फेटाळले. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वतः रेकॉर्डवरील अणु दृष्टिकोन नाकारला आहे. तुम्हाला माहिती आहेच की, भारताची अशी ठाम भूमिका आहे की भारत अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही किंवा त्याचा वापर करून सीमापार दहशतवादाला परवानगी देणार नाही.