संघविचारांचे समजले जाणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांच्या हाफिज सईद भेटीवरून संसदेत आज गदारोळ माजला. वैदिक यांचे संघाशी असलेले संबंध उघड आहेत. त्यामुळे या भेटीकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे सांगून वैदिक यांना अटक करण्याची मागणी तृणमूलचे सुगतो रॉय यांनी केली. तृणमूल काँग्रेस व काँग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. अखेरीस विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी हाफिज सईद व वैदिक भेटीशी सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू होता. वैदिक-सईद भेटीवर स्पष्टीकरण देताना सरकारची तारांबळ उडाली होती.
सुगतो रॉय म्हणाले की, वैदिक यांच्या भेटीची माहिती सरकारला होती. सरकारच्या आशीर्वादानेच ही भेट झाली. वैदिक हे बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय मानले जातात. याचाही शोध घेण्यात यावा. त्यावर संतप्त झालेल्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, या भेटीचा संबंध सरकारशी जोडणे अत्यंत दुर्दैवी आहे. वैदिक यांचा पाकिस्तान दौरा खासगी होती. त्याचप्रमाणे त्यांच्या हाफिज सईदशी झालेल्या भेटीशी सरकारचा काहीही संबंध नाही. कोण कुणाचा निकटवर्तीय आहे, या आरोपात काहीही तथ्य नाही. स्वराज यांच्या निवेदनाने विरोधकांचे समाधान झाले नाही. राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवेदन दिले. वैदिक यांच्या पाकिस्तान दौऱ्याशी सरकारचा संबंध नाही. तो त्यांचा खासगी दौरा होता, असे जेटली म्हणाले.
यूपीएससीने हिंदी भाषेला दुय्यम दर्जा दिल्याचा आरोप काही सदस्यांनी लोकसभेत केला. राजदचे पप्पू यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या काही सदस्यांनीदेखील यावर सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र लोकसभेच्या कामकाज नियमानुसार यावर चर्चा करण्याची सूचना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या सदस्यांना केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहाजहाँ रस्त्यावरील यूपीएससी कार्यालयासमोर निदर्शने केली. जंतरमंतरवर यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना या प्रकाराची माहिती दिल्यावर ते म्हणाले की, अभ्यासक्रम, हिंदी भाषांचे स्थान यावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या २४ ऑगस्ट रोजी होणारी यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. मात्र यासंबंधी सरकारकडून यूपीएससीला कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

संघाने आरोप फेटाळले
वेद प्रताप वैदिक यांचा संघाशी काहीही संबंध नाही, उलट ते काँग्रेसच्याच नेत्यांच्या गळ्यात गळे घालून अनेकदा फिरताना दिसतात, असा प्रतिहल्ला भाजप नेते राम माधव यांनी केला. काँग्रेस नेत्यांशी सख्य असलेल्या व्यक्तींचा संघाशी संबंध असू शकेलच कसा, असा प्रतिप्रश्न माधव यांनी केला.

वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असून त्यांच्या सईद भेटीसाठी इस्लामाबद येथील भारतीय उच्चायुक्तालयाने काय-काय मदत केली याबाबत आपल्याला उत्सुकता लागून राहिली आहे, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोव्हल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि  पंतप्रधान कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी.के. मिश्रा हे ज्या विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे सदस्य आहेत, त्याच संस्थेतील वेद प्रताप वैदिक हेही सदस्य आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केला.