जम्मू-काश्मीरमधील ज्या मंत्र्यांना लष्कराने पैसे दिले आहेत, त्यांची नावे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी जाहीर करावीत, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी केली. सिंग यांनी संबंधित मंत्र्यांची नावे जाहीर केल्यास केंद्र सरकार त्यांची चौकशी करेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
व्ही. के. सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा – फारुक अब्दुल्ला
‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याची खळबळजनक माहिती दिली होती. त्यावर केंद्र सरकार याची चौकशी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे यांना विचारला. त्याला उत्तर देताना सिंग यांनी नावे जाहीर केल्यास सरकार संबंधितांची चौकशी करेल, असे शिंदे यांनी सांगितले.
सिंग लष्करप्रमुख असताना काश्मीरमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती लष्कराच्या एका गोपनीय अहवालातून पुढे आली होती. सिंग यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळताना, स्वातंत्र्यापासूनच जम्मू-काश्मीरमधील मंत्र्यांना लष्कराकडून पैसे दिले जात असल्याची माहिती दिली होती.