सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या प्रमाणे सोमनाथ मंदिर बांधले त्याच प्रमाणे केंद्र सरकारने कायदा करुन राम मंदिराचे निर्माण केले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य बुधवारी म्हणाले. राम मंदिर राष्ट्रीय अभिमान आणि गौरवाचा विषय आहे. सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिर बांधले त्याप्रमाणे सरकारने जमीन अधिग्रहण करुन राम मंदिराच्या निर्माणसाठी ती सोपवली पाहिजे. सरकारने त्यासाठी कायदा करावा असे मनमोहन वैदय म्हणाले.

राम मंदिराचा प्रश्न सर्वसहमतीने सुटावा ही आमची अपेक्षा आहे अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराची सुनावणी जानेवारीतच होईल असे म्हटले आहे. यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावरून विविध वक्तव्यं येण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिराचा प्रश्न सर्व सहमतीने सुटला पाहिजे असे आम्हाला वाटते आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र या प्रश्नी लवकर तोडगा निघाला नाही तर आमच्यापुढे इतर पर्याय खुले आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

राम मंदिर प्रश्नी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे. राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढण्याची मागणी होते आहे मात्र सध्या तरी अशी काही वेळ येईल असे वाटत नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने राम मंदिर प्रश्नी लवकर तोडगा काढावा. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटावा ही आमचीही इच्छा आहे. मात्र हा प्रश्न सुटला नाही तर इतर पर्याय आहेत ज्यांचा विचार करावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. इतर पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे मात्र ते काय आहेत हे स्पष्ट केलेले नाही.