Greater Noida Nikki Dowry Murder Case : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीने विवाहित महिलेची निर्घृण हत्या करत तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रेटर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ग्रेटर नोएडातील एका निक्की नावाच्या विवाहितेची तिच्या पतीने म्हणजेच विपिनने हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, आता या घटनेत एक मोठी माहिती समोर आली आहे. निक्कीच्या निर्घृण हत्येतील मुख्य आरोपी विपिनला ग्रेटर नोएडा पोलिसांनी कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासाचा भाग म्हणून विपिनने खरेदी केलेली एक बाटली परत मिळवण्यासाठी घेऊन जात असताना आरोपीने एका अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीने कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला असता एक गोळी आरोपीच्या पायाला लागली असून आरोपी गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या चकमकीनंतर प्रतिक्रिया देताना निकीच्या वडिलांनी म्हटलं की, “पोलिसांनी योग्य काम केलं आहे. एक गुन्हेगार नेहमीच पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि विपिन हा गुन्हेगार आहे. आमची विनंती आहे की इतरांनाही पकडलं पाहिजे.”
काय आहे घटना? निक्कीच्या बहिणीचा आरोप काय?
मृत महिलेच्या बहिणीने आरोप केला आहे की, “आमचा दोघींचाही छळ होत होता. आमच्या सासरचे लोक आम्हाला सांगायचे की ३६ लाख रुपये घेऊन या. गुरुवारी पहाटे १.३० ते ४ च्या दरम्यान माझ्यावरही हल्ला झाला. त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला एका बहिणीसाठी हुंडा मिळाला, पण दुसऱ्याचं काय? आपण पुन्हा लग्न करू, मला अनेक वेळा मारहाण झाली आणि मी दिवसभर शुद्धीवर नव्हते”, असा आरोप तिने केला आहे. “त्याच संध्याकाळी माझ्या मुलांसमोर माझ्या बहिणीवर क्रूरपणे हल्ला केला. माझ्या डोळ्यांसमोर तिला जाळून टाकलं. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीही करू शकले नाही. कोणीतरी तिला रुग्णालयात दाखल केलं. मी ते पाहून बेशुद्ध पडले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या सासरच्यांनी माझ्या बहिणीला ज्या प्रकारे त्रास दिला तसाच त्रास त्यांना द्यावा अशी माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली.
निक्कीच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
“माझ्या मुलीला कट रचून ठार करण्यात आलं आहे. जे आरोपी आहेत त्यांचं एन्काऊंटर झालं पाहिजे. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं पाहिजे. तसं घडलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू. योगी सरकार राज्यात आहे. आमची विनंती आहे की निक्कीला ज्यांनी मारलं त्यांचं एन्काऊंटर झालं पाहिजे. मी विपिनला बुलेट दिली, स्कॉर्पिओ गाडी दिली. हुंडाही दिला. तरीही त्याने माझ्या मुलीला ठार केलं. माझ्या मुलीला कट रचून ठार मारण्यात आलं आहे. तिची हत्या हा पूर्वनियोजित कट आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे”, असंही निक्कीच्या वडिलांनी म्हटलं आहे.