गेल्याच आठवड्यात शिलाँगमध्ये एक वेगळी कॉनक्लेव्ह पार पडली. इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाच्या पुढाकाराने या कॉनक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणपूरक व जबाबदार पर्यटनाचं देशात संवर्धन आणि पुरस्कार करणं हा या कॉनक्लेव्हचा मूळ उद्देश होता. यामध्ये पूर्वेकडील राज्यं व ओडिशावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं.
१९ ऑक्टोबर रोजी शिलाँगच्या स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्रीन टुरिजम इंडिया कॉनक्लेव्ह पार पडली. मेघालय टुरिजम, इन्क्रेडिबल इंडिया (अतुल्य भारत), ओडिशा टुरिझम आणि अरुणाचल टुरिजम अशा तीन राज्ये व केंद्र सरकारच्या उपक्रमाचा संयुक्त सहभाग या कॉनक्लेव्हला लाभा. या कॉनक्लेव्हमध्ये ठिकठिकाणाहून आलेल्या तज्ज्ञ मंडळींनी चर्चेमध्ये सहभाग घेतला, महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण केलं. या प्रदीर्घ चर्चेनंतर शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल परंपरेचंही महत्त्व अधोरेखित करण्यात आलं.

या कॉनक्लेव्हसाठी मेघालयचे पर्यटन मंत्री बाह पॉल लिंगडोह हे प्रमुख अतिथी होते. त्यांच्याव्यतिरिक्त मेघालयच्या पर्यटन विभागाचे संचालक व मेघालय पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सिरिल दियांगडोह, ओडिशाच्या पर्यटन विभाहाचे संचालक सचिन रामचंद्र जाधव आणि इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचे सीईओ संजय सिंधवानी हेही उपस्थित होते. या कॉनक्लेव्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्रांचा समावेश होता. यात मेघालयसह पूर्वेकडच्या इतर राज्यांमध्ये जबाबदार पर्यटनाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला होता.

या कॉनक्लेव्हला पवित्र अशा दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. त्यानंतर इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचे सीईओ संजय सिंधवानी यांनी कॉनक्लेव्हला उपस्थित मान्यवरांना उद्देशून स्वागतपर संबोधन केलं.

“पर्यटन…एक शाश्वत रोजगार”
यावेळी बोलताना लिंगडोह यांनी पूर्वेकडील राज्यांसाठी प्रादेशिक पर्यटन धोरण आखण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. यासाठी व्यापक जनमत तयार करण्यामध्ये या कॉनक्लेव्हची मोठी मदत होईल, असं ते म्हणाले.

“पर्यटन हा लोकांसाठी शाश्वत स्वरुपाचा रोजगार ठरू शकतो. आपल्या देशाच्या या अत्यंत दुर्गम भागात खूप काही पाहाण्यासारखं आहे. या भागाचे दरवाजे आपण पर्यटकांसाठी खुले केले, तर हे शाश्वत रोजगाराचं माध्यम होणं सहज शक्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये, यासाठी आम्ही आता एक नवीन कायदाही तयार करत आहोत”, असं लिंगडोह यांनी नमूद केलं.

एकीकडे लिंगडोह यांनी शाश्वत रोजगार पर्ययाचा मुद्दा मांडला असताना दुसरीकडे सिरिल दियांगडोह यांनी पूर्वेकडच्या राज्यांमध्ये पर्यावरणपूरक व जबाबदार पर्यटन हेच भवितव्य असल्याची बाब अधोरेखित केली. “जबाबदार पर्यटन हे आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये हरित पर्यटन, जबाबदार पर्यटन, शाश्वत पर्यटन हेच खऱ्या अर्थानं भवितव्य आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

याच मुद्द्यावर जोर देताना इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचे सीईओ संजय सिंधवानी म्हणाले, “जबाबदार पर्यटनाची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी उद्योगजगत, व्यापार व ग्राहकांनीही आग्रहानं पुढाकार घेणं आवश्यक आहे. शाश्वत पर्यटन आपल्याला प्रत्यक्षात कशा प्रकारे अस्तित्वात आणता येईल? यात सहभागी सर्वांसाठीच हे एक आव्हान असेल. त्याअनुषंगाने अशा प्रकारच्या चर्चासत्रांमधून कल्पना समोर येऊ शकतात. त्या दिशेनं काम सुरू होऊ शकतं”.

ओडिशा सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणीय पर्यटनाच्या उपक्रमाविषयी सचिन रामचंद्र जाधव यांनी सविस्तर सादरीकरण केलं. हा उपक्रम पूर्वेकडच्या राज्यांमध्ये कशा प्रकारे राबवता येईल, यावरही त्यांनी भाष्य केलं.

अॅडव्हेंचर अँड इको-टुरिजम
या कॉनक्लेव्हमध्ये ‘द ग्रेट आऊटडोअर: व्हॉट मेक्स द नॉर्थइस्ट द परफेक्ट डेस्टिनेशन फॉर अॅडव्हेंचर अँड इको-टुरिजम’ या नावाचं एक विशेष सत्र पार पडलं. या सत्रामध्ये तज्ज्ञांनी भारतातील साहसविषयक उपक्रम आणि पर्यावरणपूरक पर्यटन याच्या सर्व बाजूंवर सविस्तर प्रकाश टाकला. ओडिशा सरकारचे पर्यटन विभाग संचालक सचिन रामचंद्र जाधव यांनी यावेळी ओडिशातील इको टुरिजम कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.

“पर्यटन विभागाचा विचार करता ओडिशा व पूर्वेकडील राज्यांमधल्या या सहकार्याचे चांगले परिणाम परस्पर सहकार्य व व्यवसाय वृद्धीसाठी दिसून येऊ शकतात. पर्यटन हे एक गुंतवणूकदारांचं क्षेत्र आहे. सरकारची भूमिका ही पडद्यामागची असते”, असं जाधव यावेळी म्हणाले.
कम्युनिटी टुरिजम कितपत फायदेशीर?
याशिवाय, समुदाय पर्यटन अर्थात ‘कम्युनिटी टुरिजम अँड होमस्टेज इन द नॉर्थइस्ट’ या सत्रामध्ये पूर्वेकडील राज्यांमधल्या कम्युनिटी टुरिजमचे वेगवेगळे पैलू समोर आले.
मेघालयमधील पर्यटन
मेघालयच्या टूर ऑपरेटर्स असोसएशनचे सरचिटणीस गेरार्ड सॅम्युएल दुईया हेही या कॉनक्लेव्हला उपस्थित होते. त्यांनी मेघालयमधील पर्यटनासमोरची आव्हानं आणि तिथल्या पर्यटनाच्या संधी याविषयी एका केस स्टडीच्या सहाय्याने सविस्तर सादरीकरण केलं.

यानंतरच्या एका सत्रामध्ये सस्टेनेबल लग्झरी ट्रॅव्हलिंगचं पर्यटनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. शेवटच्या सत्रामध्ये पर्यटन व्यवसायातील तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे उपस्थित मान्यवरांचं लक्ष वेधलं.
आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये इंडिन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट व रेव्हेन्यू हेड मुकेश सिंह यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तसेच, शाश्वत व जबाबदार पर्यटनाचा असाच विकास व प्रसार होण्यासाठी अशा प्रकारच्या आणखी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.