देशभरात १ जुलैपासून वस्तू व सेवा कर (GST) लागू करण्यात आला आहे. त्यानंतर जुने सोन्याचे दागिने विकून नवीन दागिने खरेदी केल्यास त्यावर जीएसटी भरावा लागेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. सोन्याचे दागिने वापरण्याची हौस असणाऱ्यांना या प्रश्नाने हैराण केले होते. तसेच जुन्या सोन्याच्या विक्रीनंतर नवीन दागिने खरेदी केल्यास जीएसटी भरावा लागेल, अशा प्रकारच्या अफवाही होत्या. त्याचा परिणाम सोन्याच्या व्यापारावरही झाला होता. पण आता त्याची चिंता करण्याची गरज नाही. जुने सोन्याचे दागिने विकून त्याचे मिळणारे पैसे किंवा नवीन दागिन्यांच्या खरेदीवर जीएसटी भरावा लागणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
जुने सोने ग्राहकाकडून खरेदी केल्यानंतर त्यावर ३ टक्के रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम) आकारण्याची तरतूद जीएसटीमध्ये करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांकडून जुन्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे हा सराफाचा व्यवसाय नसतो ही बाब महत्त्वाची मानून जुन्या सोन्यावर जीएसटी आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय ग्राहकांकडून सोने खरेदी करणाऱ्या सराफांनाही जीएसटी भरावा लागणार नाही. जुन्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री सीजीएसटी अॅक्ट, २०१७ मधील अनुच्छेद ९ (४) अंतर्गत येणार नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
जुनी कार-दुचाकीच्या खरेदी-विक्रीलाही हाच नियम आहे. जुन्या कार आणि दुचाकींच्या खरेदी आणि विक्रीलाही हाच नियम लागू असणार आहे. जुन्या कार आणि दुचाकींच्या खरेदी – विक्रीवर जीएसटी आकारण्यात येणार नाही.