कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी त्यांची आई आणि पत्नी लवकरच पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे.
‘कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानात असताना सुरक्षा पुरवली जाईल, अशी हमी पाकिस्तानाकडे मागण्यात आली आहे. पाकिस्तानात असताना त्यांची कोणतीही चौकशी केली जाऊ नये. त्यांना त्रास दिला जाऊ नये, अशी हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. ‘कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घडवण्याबद्दल भारत सकारात्मक आहे. जाधव यांच्या आईला मुलाची भेट घ्यायची आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडून याबद्दलची इच्छा व्यक्त केली जात आहे,’ असेही ते म्हणाले.
‘कुलभूषण जाधव यांच्या आईसोबतच त्यांच्या पत्नीलाही पाकिस्तानात यायचे आहे. त्यांनाही कुलभूषण जाधव यांना भेटायचे आहे,’ असे रवीश कुमार यांनी सांगितले. कुलभूषण यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना कायम त्यांच्यासोबत भारताचा एक राजनैतिक अधिकारी ठेवण्याची परवानगीही भारताने मागितली आहे. जाधव यांच्या आईने पाकिस्तानी विसासाठी अर्ज केला होता. याची दखल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जुलै महिन्यात घेतली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुलभूषण यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याबद्दल पाकिस्तानने सकारात्मक भूमिका घेतली. या भेटीला ‘मानवतावादी दृष्टीकोनातून’ परवानगी दिली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले होते.
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी मार्च २०१६ मध्ये अटक केली होती. बलुचिस्तान आणि कराचीमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका पाकिस्तानने जाधव यांच्यावर ठेवला. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरुन कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.