राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर गुजरातमधील सत्ता काबीज करून त्यांना अनमोल भेट द्यावी, अशी भावना काँग्रेसजनांच्या मनात आहे. तसं बघायला गेलं तर यामध्ये काही गैरही नाही. गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यातही २००१ पासून एकाच व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली या राज्याचा कारभार हाकला जातोय. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यावरही तिथे कोण मुख्यमंत्री असेल यामध्ये त्यांचीच भूमिका महत्त्वाची होती. आता त्यांच्या मर्जीने मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीने त्यांच्या मर्जीला साजेसे काम केले की नाही, हा मुद्दा चर्चेचा ठरू शकतो. पण भाजपच्या सत्तेतील २२ वर्षांपैकी सर्वाधिक काळ गुजरातमध्ये फक्त एकच व्यक्ती ट्रेंडिंगमध्ये होती ती म्हणजे नरेंद्र मोदी. पण याच नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षात केंद्रात घेतलेल्या निर्णयांमुळे परिस्थिती बदलली. मोदीविरोधी आवाजाला धार येऊ लागली. गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे आधी वातावरण तयार झाले होतेच. त्यात नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे भाजपला गुजरातमध्ये काँग्रेसचे आव्हान उभे राहिले. आता प्रश्न असा आहे की या आव्हानाचे मतांमध्ये किंवा पर्यायाने विजयामध्ये रुपांतर होणार का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने गुजरातमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले आहे, हे तर मान्यच करायला हवे. पण काँग्रेसने उभे केलेले आव्हान लोकांना समर्थ पर्याय वाटेल का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे आताच्या परिस्थितीत काँग्रेस हा गुजरातवासियांसाठी समर्थ पर्याय आहे, असे जरे तिथल्या बहुतांश लोकांना वाटले तर ते नक्कीच या पक्षाच्या पारड्यात मत टाकतील. वरवर हे अतिशय सोप्पे वाटत असले तरी तसे ते नक्कीच नाही. सर्वसाधारणपणे कोणतीही प्रस्थापित सत्ता लोकशाही मार्गाने बदलण्यासाठी मतदारांपुढे समर्थ पर्याय असावा लागतो. २०१४ची लोकसभा निवडणूक बघितल्यास हे सहज लक्षात येईल. देशातील मतदारांना काँग्रेसचे सरकार नाकारायचे होते. त्याचवेळी त्यांना मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप हा समर्थ पर्याय असल्याचे जाणवत होते. त्यामुळे लोकांनी भाजपला मतदान केले आणि पुढे जे काही घडले ते वेगळे सांगण्याची गरज नाही. गुजरातपुरता विचार केल्यास परिस्थिती इतक्या टोकाची आहे, असे जाणवत नाही. पारंपरिक मतदार भाजपच्या विरोधात मतदान करेल का, हे तूर्ततरी सांगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीशी बोलल्यावर ‘आता बस्स झालं, बदल घडलाच पाहिजे’ या स्वरुपाची भावना तो किंवा ती बोलून दाखवत नाही. अगदी बोलून दाखवली नाही, तरी त्याच्या एकूण मांडणीतून तशी स्थिती असल्याचे जाणवत नाही. त्याची अवस्था गोंधळलेली आहे. म्हणजे भाजपला नाकारून काँग्रेसला स्वीकारायचे का, याबद्दल त्याच्या मनात संभ्रम आहे. आता या स्थितीतून पुढे नेत संबंधित मतदाराचे मत आपल्या उमेदवारापर्यंत घेऊन येणे, हे काँग्रेसपुढील खरे आव्हान आहे. त्यासाठी काँग्रेसला जास्त प्रयत्न करावे लागणार हे अगदी स्पष्ट आहे. जाहीर सभा घेऊन किंवा रॅली काढून हे प्रयत्न उपयोगी पडणार नाहीत. तर शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी आवश्यक नेटवर्क राज्यात उभे केले पाहिजे. याच पातळीवर तूर्ततरी काँग्रेसची कामगिरी समाधानकारक वाटत नाही. कारण गुजरातमध्ये फिरताना ज्या काँग्रेसजनांना भेटलो. ते केवळ राहुल गांधींचा करिष्मा आणि हार्दिक पटेलने उभे केलेले आव्हान याच जीवावर सत्ता काबीज करण्याचे बोलतात. पण शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्याला काँग्रेसकडे वळविण्यासाठी काय प्रयत्न करताय, यावर त्यांच्याकडे काहीच ठोस उत्तर नसते.

काँग्रेसची ही अवस्था असताना भाजपने पेजप्रमुख नावाची संकल्पना अमलात आणून मतदारयादीतील प्रत्येक पानावरील सर्व मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी एका व्यक्तीची म्हणजेच पेजप्रमुखाची नेमणूक केलीये. इतक्या बारीक नियोजनाबरोबरच जाहीर सभा, वेगवेगळ्या व्यापारी संघटना, समाजातील वेगवेगळे घटक यांच्यासोबत बैठका या सर्व आघाड्यांवरही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मागे एका ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, हे भाजपच्याही लक्षात आले आहे. पण त्यामुळे त्यांनी प्रयत्नांचे प्रमाण आणि वेग हे दोन्हीही वाढवले आहे. काँग्रेसच्या गोटात मात्र अजूनही स्थानिक नेतृत्त्व आणि पक्षश्रेष्ठींनी लादलेले निरीक्षक यांच्यातील सनातन मतभेद कायम आहेत. कितीही नाकारले तरी हे घटक मतदानावर परिणाम करणारच आहेत. फक्त सभांना झालेल्या गर्दीवरून कोण सत्तेवर येणार याचा अंदाज लावायचा झाला तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोणता पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर हवा होता, हे स्पष्टपणे सांगायला नको.

गुजरातमध्ये प्रत्यक्ष फिरताना दिसलेले चित्र आणि बाहेरून गुजरातबद्दल दाखवण्यात येणारे चित्र यामध्येही फरक आहे. अजून पहिल्या टप्प्यातील मतदानाला चार दिवस तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आठवड्यापेक्षा जास्त दिवस शिल्लक आहेत. दोन्ही बाजूंनी प्रयत्नही जोरदार सुरू आहेत. फक्त ज्याने गृहपाठ चांगला केलाय, त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त एवढंच!

– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@loksatta.com

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly election 2017 blog written by wishwanath garud congress rahul gandhi bjp pm narendra modi ground level situation
First published on: 05-12-2017 at 03:30 IST