Gujarat ATS Arrest 3 Terrorists: गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद येथे एका मोठ्या अतिरेकी कटाचा भांडाफोड करत तीन दहशतवाद्यांना अटक केले. आरोपींवर एक वर्षांपासून पाळत ठेवली जात होती. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रांचा पुरवठा करत असताना तिघांना अटक करण्यात आली. देशाच्या विविध भागात अतिरेकी हल्ला घडवून आणण्याची योजना ते आखत होते, असे सांगितले जात आहे. याबाबत ठोस पुरावा हाती येताच गुजरात एटीएसने त्यांना ताब्यात घेतले.

गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांवर जवळपास वर्षभरापासून पाळत ठेवण्यात आली होती. हैदराबाद येथील ३५ वर्षीय डॉ. अहमद मोहिउद्दीन सैय्यद हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आणि अहमदाबादला भेट देण्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसने सापळा रचला आणि त्यांना अदलाज टोल प्लाझा येथे पकडले.

अटक करण्यात आलेला डॉ. अहमद मोहिउद्दीन सैय्यदकडे चीनची वैद्यकीय पदवी आहे. तो इतर दोघांबरोबर मिळून आंतरराष्ट्रीय रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या यादीतील रिसिन हे घातक विष तयार करण्याचा प्रयत्न करत होता.

एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लखनौ, दिल्ली आणि अहमदाबादमधील अनेक संवेदनशील ठिकाणांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्यांनी रेकी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटक करतेवेळी आरोपींकडून तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि अंदाजे ४ लिटर एरंडेल तेल जप्त करण्यात आल्याचेही एटीएसने सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेलंगणाच्या हैदराबाद येथील डॉ. अहमद मोहिउद्दीन सैय्यद (३५), उत्तरप्रदेशच्या शामलीमधील आझाद सुलेमान शेख (२०) आणि उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान (२३) यांचा समावेश आहे. आझाद सुलेमान शेख हा शिंपीचे काम करतो तर मोहम्मद सुहेल हा विद्यार्थी आहे.

आरोपींनी अतिरेकी हल्ल्याचा कट मान्य केला

उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी पुढे सांगितल्यानुसार, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एटीएसचे एसपी के. सिद्धार्थ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अहमदाबाद-मेहसाणा रोडवरील अदलाज टोल प्लाझाजवळ एक फोर्ड फिगो कार अडवली. डॉ. सय्यद चालवत असलेल्या वाहनाची तपासणी केल्यानंतर एटीएसच्या पथकाला १० लिटरच्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये साठवलेले दोन ग्लॉक पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि अंदाजे ४ लिटर एरंडेल तेल आढळले.

जोशी यांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान डॉ. सय्यदने अतिरेकी हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे मान्य केले.

सय्यद ‘रायझिन’ (रिसिन) नावाचे अत्यंत घातक विष तयार करत होता. यासाठी त्याने आवश्यक संशोधन, उपकरणे, कच्चा माल खरेदी केला. तसेच याच्या तयारीसाठी आवश्यक असलेली प्राथमिक रासायनिक प्रक्रिया सुरू केली होती. सय्यदने चीनमधून ‘एमबीबीएस’ची पदवी मिळवल्याचेही आढळून आले आहे, असे जोशी यांनी सांगितले.