गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीकडून (पास) मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून ते सत्तेवर आले तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेसने पटेल आरक्षणाची प्रमुख मागणी मान्य केली आहे. विधानसभेत गैर-आरक्षित समुदायासाठी विधेयक सादर केले जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले. काँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही पण भाजपला आमचा विरोध असेल हे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने पाटीदार समाजावर नेहमीच अन्याय केल्याचा आरोप ही त्यांनी केला. भाजपने पासच्या कार्यकर्त्यांना ५० लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले. पैसे देऊन आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पण पाटीदार समाजासाठी लढण्याचा आमचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले, अनेक राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ४९ टक्क्यांहून अधिक करण्यावर न्यायालयाने प्रतिबंध लावला आहे. अशाप्रसंगी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून काँग्रेस सत्तेवर आल्यास विधेयक आणण्यात येईल. आरक्षणाची ४९ टक्क्यांची मर्यादा पार करणे शक्य आहे. अनेक राज्यांमध्ये असं झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने पटेल समाजाला ओबीसीच्या धर्तीवर आरक्षण देण्यास सहमती दर्शवल्याचा दावाही हार्दिक पटेल यांनी केला. पाटीदारांना अन्य मागासवर्गीयांप्रमाणे लाभ मिळतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेस सरकार समिती बनवून मंडल आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर सर्व्हे केला जाईल आणि गैर-आरक्षित मागासवर्गीय लोकांना आरक्षणाचा लाभ दिला जाईल. काँग्रेस आणि मी स्वत: समजोत्याचा ड्राफ्ट तयार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही काँग्रेसला तिकीट मागितलेले नाही. तिकिटावरून कोणतेही मतभेद नाहीत असे सांगत अडीच वर्षे मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही काँग्रेसला मत देण्याचे अपील करणार नाही. पण ते लोकांसाठी काम करत आहेत. त्यामुळे निर्णय आम्ही जनतेवर सोडला आहे. भाजपने नेहमीच पाटीदार समाजावर अन्याय केला आहे. मला तर काँग्रेसचा हस्तकही म्हटले. मी काँग्रेसबरोबर आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप केला. पण पाटीदार समाजासाठी मी लढणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मतविभागणी करण्यासाठी भाजपने २०० कोटी रूपये खर्च करून अपक्ष उमेदवार उतरवल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप पाटीदार समाजाचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते निवडणुकीच्या लढाईत पराभूत झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat elections we agree with congress formula for reservation to patidars says hardik patel
First published on: 22-11-2017 at 12:46 IST