जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात गुजरात राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकात देशभक्ती, भारत माता आणि भारतीय संस्कृतीस स्थान देण्यात येणार आहे. ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ नववी आणि दहावीच्या हिंदी प्रथम भाषा आणि हिंदी द्वितिय भाषेच्या पुस्तकात ‘मनुष्य तू बंदा महान है’ या गीताचा समावेश करणार आहे. पंडित भारत व्यास यांनी लिहिलेले हे गीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या शाखांमध्ये गायले जाते. याशिवाय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेल्या ‘कदम मिलाकर चलना होगा’ गीताचादेखील पुस्तकात समावेश होणार आहे. ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या आत्मकथेतील एका भागाचादेखील शालेय पुस्तकामध्ये समावेश करणार आहे. पंडीतजींच्या आत्मचरित्रातील या भागात नेहरूंनी रोहतकच्या (हरियाण) शेतकऱ्यांना ‘भारत माता की जय’ विषयी संबोधित केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थान बोर्डाच्या शालेय पुस्तकातून जवाहरलाल नेहरूं संबंधीचा भाग काढून टाकण्यात आला होता. ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’च्या निर्णयाविषयी बोलताना बोर्डाचे अध्यक्ष नितीन पेठानी म्हणाले की, यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे… साहित्याच्या माध्यमातून आम्ही हे अतिशय प्रभावीपणे केले आहे… यामुळे युवकांमध्ये हळूहळू कमी होत चाललेली देशप्रेमाची भावना निर्माण होईल.