रजिस्टर पद्धतीने विवाह केल्यानंतर त्याने सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती. पत्नी लवकरच घरी नांदायला येईल, अशी त्याला अपेक्षा होती. लग्न होऊन काही महिने उलटल्यानंतरही, पत्नी घरी नांदायला येत नाहीय, म्हणून त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नीचे आई-वडिल तिच्यावर दबाव टाकताय़त, त्यांनी तिला कैद करुन ठेवले आहे, असा त्याचा समज होता. पण हा भ्रम अखेर कोर्टात मोडला.

कधी झाला विवाह?
तीन महिन्यांपूर्वी तीन जुलै रोजी शाहपूर येथील रजिस्ट्रारर कार्यलायत त्यांनी विवाह केला होता. पत्नीच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध आहे, त्यामुळे ती आपल्यासोबत नांदायला येऊ शकत नाहीय, असा त्याचा समज होता.

लग्नानंतर महिनाभर वाट पाहिली. त्यानंतर पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पत्नीची तिच्या आई-वडिलांच्या घरातून सुटका करावी, अशी विनंती त्याने केली. पोलिसांनी काही कारवाई केली नाही, तेव्हा त्याने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीला तिच्या आई-वडिलांनी बेकायदारित्या कैद करुन ठेवले आहे, असा आरोप त्याने केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

कोर्टात काय घडलं?

सदर महिला गुरुवारी कोर्टात हजर झाली. न्यायालयाच्या चौकशीत तिने याचिकाकर्त्यासोबत शाहपूर येथे रजिस्टर पद्धतीने विवाह केल्याचे कबूल केले. पण या दरम्यान सोशल मीडियावरुन संपर्कात आलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे तिने न्यायाधीशांना सांगितले. ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या ती प्रेमात पडली, ती मुस्लिम असल्याने तिने धर्मांतर करुन नंतर विवाह केला. याचिकाकर्ताही तिचा कायदेशीर पती आहे, पण आता ती त्याच्यासोबत रहायला तयार नाहीय.

पहिल्या पतीपासून कायदेशीरित्या विभक्त झाल्याशिवाय, नव्या नात्याला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही, असे न्यायाधीशांनी तिला समजावले. या प्रकरणात खरे पीडित तर महिलेचे वडिल आहेत, असे न्यायालयाच्या लक्षात आले. कारण मुलीच्या या दोन लग्नांबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. कायदेशीर दृष्टीकोनातून महिलेनेच समस्या निर्माण केली आहे, त्यामुळे तिलाच ती सोडवावी लागेल असे न्यायाधीशांनी सांगितले.