खरंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता साडेतीन वर्षे झालीत. आता ते केवळ गुजरातचे नेते राहिलेले नाहीत, तर देशाचे पंतप्रधान झाले आहेत. या काळात गुजरातने दोन मुख्यमंत्री पाहिले. आनंदीबेन पटेल यांनी या साडेतीन वर्षांत सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवले. तर विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारूनही वर्षभराचा काळ उलटून गेला. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये फिरताना भाजपच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदीच केंद्रस्थानी असल्याचे जाणवते. त्यांच्या ५६ इंचाच्या छातीकडे बघून आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवून मतदार आपल्याला मतदान करतील, असं भाजपला वाटत असावं. त्यामुळे होर्डिंग्ज, प्रचारपत्रके, बॅनर्स, वृत्तपत्रांतील जाहिराती, टीव्हीवरील जाहिराती यामध्ये नरेंद्र मोदीच प्राधान्याने दिसतात. इतकंच काय गुजरातमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तीशी बोलताना त्याच्या सगळ्या आठवणी नरेंद्र मोदींभोवतीच केंद्रिभूत झालेल्या असतात. तो आजही नरेंद्रभाईंनी काय काय केले हेच सांगतो. गेल्या साडेतीन वर्षांतील गुजरात त्याच्या विस्मृतीत गेल्यासारखीच स्थिती आहे. त्याला मे २०१४ पूर्वीचाच गुजरात आज डिसेंबर २०१७ मध्ये आठवतोय आणि तो त्याच संदर्भातून सगळं बोलत असतो. म्हणजे गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणीही असू दे, त्याचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदींच्याच हातात असल्याचे त्याने मनोमन स्वीकारलंय, असंच जाणवतं. जी स्थिती भाजपची तीच काँग्रेसची. फरक इतकाच की काँग्रेसच्या प्रचारामध्ये राहुल गांधींसोबत सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्याही छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. पण राज्यातील नेतृत्त्व कोणतं? हा प्रश्न अनुत्तरितच. भाजप किंवा काँग्रेस या पैकी कोणताही पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आला तरी तिथे नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी मुख्यमंत्री होणार नाहीत. पण तरीही या दोन्ही पक्षांची प्रचाराची संपूर्ण धुरा या दोन नेत्यांच्या खांद्यावरच आहे.

गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत. त्यामुळे सत्तेसाठी भाजप किंवा काँग्रेस यांना ९२ जागा जिंकणे आवश्यक ठरणार आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेस हा आकडा गाठू शकलेला नाही. तर याच चार निवडणुकांमध्ये भाजपने शंभरी ओलांडून निवडणुकीत लक्षवेधी यश मिळवले आहे. यावेळी १५० जागा जिंकू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचेच सुपूत्र अमित शहा यांनी दाखवला असला, तरी परिस्थिती भाजपला इतकी अनुकूल आहे, असे वाटत नाही. त्यामुळेच जाहीर सभांमध्ये भाजपचे नेते सहजपणे गुजरातमध्ये सत्ता संपादन करण्याबद्दल काहीही बोलत असले, तरी खासगीमध्ये ते तसे बोलत नाहीत. कारण त्यांनाही जमिनीवरचं वास्तव काय, याची माहिती आहे. त्यामुळे खासगीमध्ये पोकळ बाता करणे ते जाणीवपूर्वक टाळतात आणि सत्ता काबीज करण्यासाठी ९२ चा आकडा कसा गाठता येईल, याची वेगळी मांडणी करतात. गुजरातमधील गेल्या तीन निवडणुकांमध्ये ५६ जागा अशा आहेत की तिथं भाजपच्या उमेदवाराचा कधीच पराभव झालेला नाही. या जागांवर पक्षाने दिलेले उमेदवार तेथील मतदारांनी निवडून दिले आहेत. या सर्व जागा शहरी भागातील म्हणजेच अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, भावनगर या भागांतल्या आहेत. या जागांवर भाजपने यंदाही जास्त लक्ष केंद्रित केले आहे. जेणे करून या सर्व जागा भाजपला जिंकता याव्यात आणि ९२ जागांमधील एक मोठा आकडा भाजपच्या पारड्यात पडावा. ५६ जागांवर जर भाजपला यश मिळालेच, तर त्यांना सत्ता मिळवण्यासाठी अन्य ठिकाणच्या ३६ जागांची गरज पडणार आहे. म्हणजे १२६ जागांपैकी ३६ जागांवर पक्षाला विजय मिळवावा लागणार आहे. भाजपच्या नेत्यांना हे तितकेसे अवघड काम आहे, असे वाटत नाही. त्यामुळेच गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असे ते छातीठोकपणे सांगतात. त्याचवेळी ते काँग्रेसला १८२ जागांमधून ९२ जागा जिंकायच्या आहेत, याकडेही बोट दाखवत ते तितकेसे शक्य नाही, असे स्पष्टपणे न बोलता केवळ हावभावांवरून सांगतात.

एकीकडे गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ३१ पैकी २३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले होते. पटेल आंदोलन, सौराष्ट्र आणि कच्छमधील सिंचनाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाचे प्रश्न योग्य पद्धतीने न हाताळल्यामुळे भाजपला या ठिकाणी फटका बसला. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना एकदाही भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतक्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले नव्हते.

दुसरीकडे नगरपालिका आणि नगर परिषदांमधील ५६ पैकी ४२ ठिकाणी भाजपला विजय मिळाला होता. याचाच अर्थ शहरी भागांमध्ये आजही भाजपचाच वरचष्मा आहे. तर ग्रामीण भागाचे प्रश्न योग्य पद्धतीने न हाताळल्यामुळे त्यांनी भाजपला नाकारून काँग्रेसला मत दिले.

गुजरातमधील शहरी आणि ग्रामीण भागातील या स्थितीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे, असे इथे फिरल्यानंतर जाणवत नाही. त्यामुळेच ९२ जागांचा आकडा कोणता पक्ष गाठणार, गुजराती जनता नरेंद्र मोदींकडे बघून त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपच्या पारड्यात मत टाकणार का, त्या ५६ जागा यावेळीही राखण्यात भाजप यशस्वी ठरणार का, ग्रामीण भागातील जनता राहुल गांधींवर विश्वास ठेवून काँग्रेसला मतदान करणार का, असे प्रश्न उपस्थित होताहेत आणि त्याची उत्तरे तूर्ततरी कोणालाच माहिती नाही. त्यासाठी आणखी थोडी वाट बघावी लागेल…

– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@loksatta.com